भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चार सामने झाले असून आता पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारपासून सिडनी येथे खेळला जाईल. सध्या ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाचं लक्ष्य मालिका बरोबरीत सोडवण्याकडे असेल.
या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. तो पाठीच्या समस्येमुळे खेळू शकणार नाही. अशा स्थितीत संघात त्याची जागा कोण घेणार, हा मोठा प्रश्न आहे. चला तर मग, आम्ही तुम्हाला या लेखात अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे सिडनी कसोटीत आकाश दीपची जागा घेऊ शकतात.
(3) ध्रुव जुरेल – युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत संधी मिळाली होती. मात्र त्यानंतर पुढच्या तीन सामन्यात रोहित शर्मा संघात परतल्याने त्याला बाहेर बसावं लागलं. आता त्याचं संघात पुनरागमन होऊ शकतं. सिडनी कसोटीत आकाशदीपच्या जागी जुरेलचा संघात समावेश करून भारतीय संघ आपली फलंदाजी मजबूत करू शकतो. मात्र जुरेलच्या समावेशामुळे अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीची जबाबदारी वाढू शकते, कारण त्याला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावावी लागेल.
(2) हर्षित राणा – आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या हर्षित राणानं या मालिकेद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये राणाला संधी मिळाली. त्यानंतर त्याला वगळण्यात आलं. आता दिल्लीच्या या वेगवान गोलंदाजाचा सिडनी कसोटीत पुन्हा संघात समावेश होऊ शकतो.
(1) प्रसिद्ध कृष्णा – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा बराच काळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघासोबत आहे. तो इंडिया ए कडून खेळला, त्यानंतर तो टीम इंडियाचा भाग बनला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या या कसोटी मालिकेत त्याला आतापर्यंत संधी मिळालेली नाही. मात्र शेवटच्या कसोटीत आकाशदीपचा बदली खेळाडू म्हणून त्याचा समावेश केला जाऊ शकतो.
हेही वाचा –
IND vs AUS: सिडनी कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग 11 बदलणार? या खेळाडूचे होणार कमबॅक
रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळणार? गौतम गंभीरच्या या उत्तराने सगळेच थक्क
IND VS AUS; सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा, या अष्टपैलू खेळाडूला वगळले