आत्तापर्यंत इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात १३ संघ खेळले आहेत. पण त्यातील आता केवळ ८ संघ सक्रिय आहेत. तर ५ संघ आता आयपीएलमध्ये काही काळासाठीच होते. या ५ संघापैकी पुण्याची फ्रँचायझी असणारे २ संघ होते. एक म्हणजे पुणे वॉरियर्स इंडिया आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स. तसा या दोन्ही संघांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. पण हे दोन्ही संघ पुण्याचे होते इतकच त्यांच्यात साम्य आहे.
पुणे वॉरियर्स इंडिया संघ २०११ मध्ये आयपीएलमध्ये सामील झाला होता. हा संघ २०१३ पर्यंत आयपीएलचा भाग होता. या संघाकडून युवराज सिंग, सौरव गांगुली, मायकल क्लार्क असे काही दिग्गज खेळाडू खेळले.
तर २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आल्याने आयपीएलमध्ये २ नवीन संघ सामील करण्यात आले. त्यात रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचाही समावेश होता. या संघाकडून एमएस धोनी, आर अश्विन, केविन पीटरसन, फाफ डू प्लेसिस, बेन स्टोक्स असे खेळाडू खेळले.
असे असले तरी काही खेळाडू असे आहेत जे पुणे वॉरियर्स इंडिया आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स अशा दोन्ही संघांकडून खेळले आहेत. अशाच ३ खेळाडूंचा घेतलेला हा आढावा –
पुणे वॉरियर्स इंडिया आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघांकडून खेळलेले ३ खेळाडू (3 players who has played for pune warriors india and rising une supergiants) –
३. मिशेल मार्श – ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्श आयपीएलमध्ये आत्तापर्यंत केवळ ४ मोसम खेळला आहे. त्यातील २०११ आणि २०१३ या दोन मोसमात तो पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळला. या दोन मोसमात मिळून त्याने १४ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या. तसेच १९० धावा केल्या.
तसेच तो २०१६ ला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. त्याने या मोसमोत केवळ ३ सामने खेळले. त्यात त्याला ४ विकेट्स घेण्यात यश आले तर फलंदाजी करताना त्याला केवळ ७ धावाच करता आल्या. त्यानंतर तो दुखापतीमुळे बाहेर पडला.
मार्शने आयपीएलमध्ये २०१० ला डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना पदार्पण केले होते. विशेष म्हणजे मार्श आत्तापर्यंत ज्या संघांकडून आयपीएलमध्ये खेळला त्यातील एकही संघ सध्या आयपीएलमध्ये सक्रिय नाही. तसेच मार्शला आता २०२० आयपीएलसाठी सनरायझर्स हैद्राबादने संघात घेतले होते.
२. अशोक डिंडा – भारताचा गोलंदाज अशोक डिंडा आयपीएलमध्ये २००८ ते २०१७ या दरम्यान १० मोसम खेळला आहे. त्यातील २०१२ आणि २०१३ मध्ये तो पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळला. त्याने या दोन मोसमात २० सामने खेळले. यात त्याने २५ विकेट्स घेतल्या.
तसेच त्यानंतर तो २०१६ आणि २०१७ या २ मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. त्याला या २ मोसमात १२ सामने खेळण्याची संधी मिळाली. या १२ सामन्यात त्याने १२ विकेट्स घेतल्या. तसेच २०१७ नंतर डिंडा आयपीएलमध्ये खेलला नाही.
१. स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आयपीएलमध्ये ७ मोसमात खेळला आहे. त्याने आयपीएलमध्येे २०१२ ला पुणे वॉरियर्स इंडिया संघाकडून पदार्पण केले होते. तो त्यावेळी २०१२ आणि २०१३ चा मोसम या संघाकडून खेळला. त्याने पुणे वॉरियर्स इंडियाकडून २२ सामने खेळताना ५२१ धावा केल्या.
त्यानंतर तो २०१६ आणि २०१७ ला रायझिंग पुणे सुुपर जायंट्स संघाकडून खेळला. पण २०१६ ला तो काही सामने खेळल्यानंतर दुखापतीमुळे त्या मोसमातून बाहेर पडला होता. पण असे असले तरी त्याला २०१७ ला या संघाचे कर्णधारपद मिळाले.
त्याच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने अंतिम सामन्यातही धडक मारली होती. परंतू त्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध १ धावेने पराभूत व्हावे लागले. त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून २ मोसमात मिळून २३ सामने खेळले. यामध्ये त्याने ७४२ धावा केल्या होत्या. तसेच यात त्याच्या १ शतकाचाही समावेश आहे.