---Advertisement---

एबीचा पर्याय म्हणून या तीन खेळाडूंवर असेल आरसीबीची नजर; सर्वांनी गाजवलेत विश्वचषक

On: शनिवार, नोव्हेंबर 20, 2021 5:10 PM
---Advertisement---

‘मिस्टर ३६०’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या घोषणेनंतर तो पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याची आयपीएलमधील १३ वर्षांची कारकीर्द संपली आहे. यातील तो ११ वर्षे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एबी डिविलियर्सने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १८४ सामने खेळले. त्याने लीगमध्ये तीन शतके आणि ४० अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५१६२ धावा झाल्या आहेत. डिविलियर्सने २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतु, चौथ्या सत्रात तो आरसीबीमध्ये सामील झाला.

त्याचे या फ्रँचायझीशी त्याचे विशेष नाते जोडले गेले होते. या संघात त्याला विराट कोहलीच्या रूपाने एक चांगला मित्र मिळाला. दोन्ही खेळाडूंच्या मैत्रीचे उदाहरण दिले जाते. एबी डिविलियर्सच्या निवृत्तीनंतर आरसीबीमध्ये चौथ्या क्रमांकाचे पद रिक्त झाले आहे, जे फ्रँचायझीसाठी भरणे कठीण आहे. मात्र, त्याच्या जागी काही परदेशी खेळाडू आहेत जे त्याची उणीव भरून काढू शकतात.

१. जोस बटलर
जोस बटलरने ६५ आयपीएल सामन्यांमध्ये ३५.१४ च्या सरासरीने आणि १५० च्या स्ट्राइक रेटने १९६८ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो ८ डावात नाबाद राहिला आहे. बटलरची सर्वोच्च धावसंख्या १२४ आहे. बटलरने १ शतक आणि ११ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याने १९४ चौकार आणि ९० षटकार मारले आहेत. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी ७ सामन्यात २५४ धावा केल्या होत्या. आयपीएल २०२२ साठी मेगा लिलाव होण्यापूर्वी, प्रत्येक फ्रँचायझीकडे ४ खेळाडू राखून ठेवण्यासाठी असतील.

या स्थितीत त्याला जोस बटलर, बेन स्टोक्स, एविन लुईस आणि जोफ्रा आर्चर यापैकी एकाची निवड करावी लागेल. बटलरच्या अनुपस्थितीत लुईसने यशस्वी जैस्वालसह संघाला सातत्यपूर्ण सुरुवात करून दिली होती. त्याचवेळी संघाला जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स गमावायचे नाही. अशा स्थितीत बटलरची लिलावात जाण्याची शक्यता वाढणार आहे. या स्थितीत आरसीबी बटलरला त्यांच्या संघात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. बटलर सलामीसह मधल्या फळीतही चांगला खेळ करतो.

२. चरिथ असलंका
एबीच्या जागी श्रीलंकेचा युवा फलंदाज चरिथ असलंका योग्य ठरू शकतो. मैदानाभोवती चौफेर फटके खेळण्यास सक्षम असलेल्या असलंकाने टी२० विश्वचषकात आपल्या कामगिरीने क्रिकेट चाहत्यांना चकित केले होते. कमी लेखल्या जात असलेल्या श्रीलंकेच्या संघाच्या या युवा फलंदाजाने दमदार कामगिरी करून सर्वांनाच चकित केले होते. बदलातून जात असलेल्या श्रीलंकेच्या संघाचा आधार असलंंका बनला आहे.

श्रीलंकेच्या या फलंदाजाने टी२० विश्वचषकात ६ सामन्यात २३१ धावा केल्या होत्या, तर तो एकदा नाबाद राहिला. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या अशी ८० होती. यादरम्यान त्याची सरासरी ४६.२ आणि स्ट्राइक रेट १४७.१३ होता. असलंकाने टी२० विश्वचषकात २ अर्धशतके ठोकली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २३ चौकार आणि ९ षटकार आले होते.

चरिथ असलंकाच्या संपूर्ण टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, तो फक्त ९ सामने खेळला आहे. असलंकाने ३७ च्या सरासरीने आणि १३२.८८ च्या स्ट्राइक रेटने २९५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा अलीकडचा फॉर्म पाहता आरसीबी त्याला परदेशी खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करू शकते.

३. मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाला टी२० विश्वचषक स्पर्धेत विजेता बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारा मिचेल मार्श एबी डिव्हिलियर्सची पोकळी बऱ्याच अंशी भरून काढू शकतो. विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ५० चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ७७ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम राहील. मार्शने ६ अर्धशतकांच्या मदतीने टी-२० आंतरराष्ट्रीय प्रकारामध्ये ८८५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना ५ विकेट्सही घेतल्या आहेत. मार्श आरसीबीमध्ये आल्यास संघाला एक आक्रमक फलंदाज तसेच एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिळेल, जो महत्त्वाच्या प्रसंगी संघाला बळी मिळवून देऊ शकेल. ज्याप्रमाणे, मॅक्सवेलच्या आगमनाने संघाने समतोल साधला, त्याचप्रमाणे मार्शही अष्टपैलू कामगिरी करून संघाला साथ देऊ शकतो.

मात्र, आयपीएलमध्ये मिचेल मार्शचा रेकॉर्ड काही चांगला राहिलेला नाही. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २१ सामन्यांच्या १५ डावांमध्ये दोनदा नाबाद राहताना १७.३१ च्या सरासरीने आणि ११४.२१ च्या स्ट्राइक रेटने केवळ २२५ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने ७.९ च्या इकॉनॉमीसह २० विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये फ्रँचायझीने फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर अधिक भर दिला आहे. परंतु अलिकडच्या काळात, मार्शने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यामुळे आरसीबी त्याला त्यांच्या संघात सामील करू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---