भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या २०२७च्या विश्वचषकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतली असून सध्या ते भारताच्या केवळ वनडे संघात खेळताना दिसतात. त्यामुळे २०२७ वनडे विश्वचषकातील त्यांच्या जागेवरून चर्चा सुरू झाल्या. काहींनी दोघांच्या वयावरून प्रश्न निर्माण केले असून त्यांच्यासाठी धोनीचे हे वक्तव्य थेट उत्तरासारखेच आहे.
धोनी क्रिकेट समालोचक जतिन सप्रूच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होता. तेव्हा त्याला जतिनने ‘तुला काय वाटते रोहित-विराट २०२७च्या विश्वचषकात खेळतील?’ त्यावर धोनी म्हणाला, ” का नाही? कोणी पुढचा विश्वचषक का खेळू नये? माझ्या मते, वय काही अडचण नाही. कामगिरी, फिटनेस हे महत्वाचे आहेत. माझ्यामते कोणालाही काय करावे आणि काय करू नये हे सांगू नये. एक गोष्ट मात्र स्पष्ट केली पाहिजे की, प्रत्येकाला समान वागणूक दिली जाईल. मी २४ वर्षाचा असताना पदार्पण केले. तेव्हा मला कोणी येऊन काही सांगितले नाही. त्यामुळे मी भारतासाठी एक वर्ष, दोन वर्ष, दहा वर्ष खेळावे की नाही कोणीही ठरवू नये आणि माझ्या वयाबाबत सांगू नये.”
वनडे विश्वचषक २०२७ पर्यंत रोहित ४० वर्षाचा तर विराट ३९ वर्षाचे असतील. त्यामुळे त्यांच्या वयावरही प्रश्न विचारले जात आहेत. भारताकडून धोनीने वयाच्या ३९ वर्षापर्यत क्रिकेट खेळले. त्याने २०१९च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीनंतर निवृत्ती घेतली.
रोहित-विराट संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत असतील त्यांनी संघात का नाही राहावे, यावरही धोनीने त्याचे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “जर ते चांगली कामगिरी करत राहिले आणि देशासाठी चांगले करण्याची त्यांची इच्छा असेल, तर का नाही? तुम्हाला अनुभवी खेळाडू कसे मिळतात? सचिन तेंडुलकर असल्याशिवाय तुम्हाला 20 वर्षांचा अनुभवी खेळाडू मिळू शकत नाही. प्रत्येकाशी समान वागा, जर ते चांगली कामगिरी करतील, तर ते संघात असतील. जर ते चांगली कामगिरी करत नसतील, तर ते संघात नसतील.”
विराटने खेळलेल्या मागील ७ वनडे सामन्यात ६१६ धावा केल्या असून रोहितही काही मागे नाही. त्याने त्याच्या मागील १० वनडेत ४०१ धावा केल्या आहेत.






