बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा 10 गडी राखून लाजीरवाणा पराभव झाला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ‘बॅटिंग पिच’वर पाकिस्तानी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. याचा परिणाम असा झाला की, डाव घोषित करून देखील पाकिस्तानला पराभव पत्कारावा लागला. बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील हा पहिला विजय आहे. पाकिस्तानची एवढी वाईट अवस्था का झाली, यामागची 3 कारणं या बातमीद्वारे समजून घेऊया.
(1) पाकिस्तानने बांगलादेशला हलक्यात घेतलं – बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 6 गडी बाद 448 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शान मसूद डावपेचांत पूर्णपणे अपयशी ठरला. पाकिस्ताननं फार पूर्वीच डाव घोषित केला, ज्यामुळे रिझवानला द्विशतकही पूर्ण करता आलं नाही. दुसऱ्या डावात हा निर्णय त्यांच्यावरच उलटला.
(2) बांगलादेशच्या फलंदाजांचा पलटवार – बांगलादेशनं फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या काही विकेट्स स्वस्तात पडल्या. मात्र त्यानंतर मुशफिकुर रहीमच्या (191) नेतृत्वाखाली बांगलादेशच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडला. पहिला डाव संपल्यानंतर बांगलादेशनं 565 धावा केल्या होत्या आणि 117 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. बांगलादेशकडून अशा फलंदाजीची कोणालाही अपेक्षा नव्हती.
(3) बाबर दोन्ही डावात फ्लॉप – पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि रन मशिन बाबर आझमची दोन्ही डावातील फ्लॉप कामगिरी पाकिस्तानला चांगलीच महागात पडली. पहिल्या डावात दोन चेंडू खेळणाऱ्या बाबरला खातंही उघडता आलं नाही. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो फक्त 22 धावाच करू शकला. तो जर खेळपट्टीवर टिकून राहिला असता, तर इतर युवा फलंदाजांना आत्मविश्वास मिळाला असता. परंतु बाबरच्या दोन्ही डावांतील अपयशाचा संघाच्या मनोबलावर परिणाम झाला.
हेही वाचा –
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की
शाकिब अल हसननं पुन्हा संयम गमावला, मैदानावरील या कृतीनं सगळेच हैराण
बाबर आझमला कसोटी संघातून डच्चू मिळणार? आकडेवारी फारच लाजिरवाणी