---Advertisement---

इशान किशनचा धुमाकूळ! तुफानी फटकेबाजीने मोडला युवराजचा 14 वर्ष जुना रेकॉर्ड

On: रविवार, फेब्रुवारी 15, 2026 8:42 PM
---Advertisement---

कोलंबोच्या मैदानावर इशान किशनने आपल्या वादळी फलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इशानने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक ठोकले.

​अभिषेक शर्मा स्वस्तात बाद होऊन माघारी परतल्यानंतर, यष्टिरक्षक फलंदाज इशानने तिलक वर्मासोबत मिळून डावाची सूत्रे हाती घेतली आणि पाकिस्तानच्या गोलंदाजीचे अक्षरशः वाभाडे काढले. यावेळी इशानने युवराज सिंगचा १४ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रमही मोडीत काढला आहे.

​आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि सलमान आगाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पाकिस्तानची सुरुवात त्यांच्या नियोजनाप्रमाणे झाली आणि सलमान आगाने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला बाद केले. मात्र, त्यानंतर दुसऱ्या टोकाला असलेल्या इशान किशनने आपला आक्रमक पवित्रा दाखवण्यास सुरुवात केली.

​शाहीन शाह आफ्रिदीच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार ठोकून इशानने आपले इरादे स्पष्ट केले. या डावखुरा फलंदाजासमोर पाकिस्तानची गोलंदाजी पूर्णपणे हतबल दिसली आणि त्याने केवळ २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. इशानने एकूण ४० चेंडूंचा सामना करत ७७ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ३ उत्तुंग षटकार लगावले.

​इशान किशनने या धडाकेबाज अर्धशतकासह युवराज सिंगचा मोठा विक्रम मोडला आहे. इशान आता पाकिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने युवीचा विक्रम मोडीत काढला आहे; युवराजने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. दरम्यान, सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे, ज्याने २०२५ मध्ये केवळ २४ चेंडूत पन्नास धावा कुटल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---