पाकिस्तान क्रिकेट संघ 2024 टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला आहे. संघानं स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सैन्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. तसेच इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी20 मालिकाही खेळली होती. मात्र, टी20 विश्वचषकादरम्यान हे काहीच कामी आलं नाही आणि पाकिस्तानला ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडावं लागलं.
पाकिस्तानच्या संघाला पहिल्याच सामन्यात मोठा अपसेट सहन करावा लागला. अमेरिकेच्या संघानं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. यानंतर पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धचा सामनाही हरला. या दोन पराभवांमुळे त्यांच्या सुपर 8 मध्ये स्थान मिळवण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना रद्द होताच पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं.
या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला ते 3 कारणं सांगणार आहोत, ज्यामुळे पाकिस्तानला टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडावं लागलं.
(1) खेळाडूंमधील गटबाजी – टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघात बरेच बदल पाहायला मिळाले. शाहिन आफ्रिदाला हटवून बाबर आझमला पुन्हा कर्णधार बनवण्यात आलं. यामुळे बाबर आणि शाहीन यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या. तसेच मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांना निवृत्तीनंतर परत संघात बोलावण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान संघात दोन गट पडले होते आणि याचा फटका संघाला सहन करावा लागला.
(2) खराब क्षेत्ररक्षण – पाकिस्तानी खेळाडूंचं खराब क्षेत्ररक्षण नेहमीच त्यांच्यासाठी अडचणीचं ठरलं आहे. यावरून अनेकदा त्यांची खिल्लीही उडवली गेली आहे. 2024 च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचं क्षेत्ररक्षण अत्यंत खराब राहिलं. अमेरिकेचा सामना असो किंवा भारताविरुद्धचा सामना, पाकिस्तानी खेळाडूंनी अनेक सोप्या संधी गमावल्या. भारताविरुद्धच्या सामन्यात तर पाकिस्तानी खेळाडूंनी रिषभ पंतचे चार झेल सोडले, ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला.
(3) बाबर आझमची खराब फलंदाजी आणि नेतृत्व – पाकिस्तानच्या या स्थितीला कर्णधार बाबर आझम मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. या विश्वचषकात त्याचं नेतृत्व अत्यंत वाईट राहिलं. अमेरिकेविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये त्यानं नसीम शाहला गोलंदाजी देण्याऐवजी मोहम्मद आमिरला संधी दिली. यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली. तर अमेरिकेविरुद्ध त्यानं शेवटच्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाला सीमारेषेवर लावलं नाही, ज्याचा फायदा घेत नितीश कुमारनं चौकार मारून सामना बरोबरीत आणला. भारताविरुद्धही त्यानं इफ्तिखार अहमदला आधी न पाठवून चूक केली. याशिवाय बाबर आझमची स्वत:ची फलंदाजीही अत्यंत खराब राहिली. त्याला एकाही सामन्यात मोठी खेळी खेळता आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातील टॉप 5 रोमांचक सामने, ज्यात संघानं एका धावेनं विजय मिळवला
‘कुदरत का निजाम’ पुन्हा एकदा अपयशी! पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मोक्याच्या क्षणी नेहमीच होतो फ्लॉप
टी20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला दुहेरी झटका, 2026 च्या स्पर्धेत थेट एंट्री मिळणार नाही!