इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका या संघांप्रमाणे भारतीय संघाने देखील क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या खेळाडूंच्या नेतृत्वात खेळावे अशी चर्चा होत असते. सध्या विराट कोहली (Virat Kohli) भारताचा तिनही प्रकारात एकमेव कर्णधार आहे तर कसोटी सामन्यांसाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) हे उपकर्णधार आहेत.
भारतीय क्रिकेटचाहत्यांची तसेच काही तज्ञ व माजी खेळाडूंची मागणी राहिली आहे की, कमीत कमी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी रोहित शर्मा भारताचा कायमस्वरूपी कर्णधार असावा. कारण, रोहित शर्माने विराटच्या अनुपस्थितीत भारताला अनेक महत्वपूर्ण विजय मिळवून दिले आहेत.
आज आपण त्या तीन कारणांचा आढावा घेऊयात, ज्यामुळे रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत भारताचे नेतृत्व करू शकतो.
१) टी२० सामन्यांत कप्तानीचा शानदार रेकॉर्ड
रोहित शर्मा भारताचा टी२० कर्णधार होण्यासाठीचे पहिले कारण की, रोहितचा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात कप्तानीचा रेकॉर्ड हा विराटपेक्षा वरचढ आहे. रोहितने आतापर्यंत १९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे यातील १५ सामन्यात भारताने विजय मिळविला आहे. त्याची विजयाचे टक्केवारी ७८.९४ अशी आहे. तर, विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या सामन्यांत हीच टक्केवारी ६५.७१ आहे.
वनडेमध्ये देखील रोहित शर्मा कप्तानी करताना यशस्वी ठरला आहे. वनडे प्रकारात त्याची विजयाची टक्केवारी ८० टक्के तर विराटची ७१.८३ इतकी आहे. आकडेवारीच्या या खेळात सध्यातरी रोहितच पुढे आहे.
२) आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार
आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) नेतृत्व करतो तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची (Royal Challengers Bangalore) धुरा वाहतो. दोघांनीही २०१३ च्या आयपीएल मोसमापासून आपापल्या संघांची जबाबदारी खांद्यावर घेतली. २०१३ ते २०१९ या सात वर्षाच्या काळात रोहितने आपल्या संघाला चार वेळा विजेतेपद मिळवून दिले तर विराटचा विजेतेपदाचा रकाना रिकामाच राहिला.
रोहितने आपल्या कल्पक नेतृत्वाने २०१३,२०१५,२०१७ व २०१९ असे तब्बल चार वेळा मुंबई इंडियन्स ला विजयी केले आहे. त्याचवेळी विराट आपल्या संघाला फक्त २०१६ च्या मोसमात अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाऊ शकला.
३) रोहितच्या खात्यावर आहे दोन बहुराष्ट्रीय स्पर्धांचे जेतेपद
रोहितला कर्णधारपदी कायम करण्याचे एक प्रमुख कारण आहे की, रोहितच्या नावे कर्णधार या नात्याने दोन बहुराष्ट्रीय स्पर्धांची (Multinational Tournaments) विजेतेपदे आहेत.
२०१८ साली, सहा देशांचा सहभाग असलेली आशिया कप (Asia Cup) स्पर्धा व भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेली निदहास ट्रॉफी भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकली आहे.
विराटच्या नेतृत्वात भारत २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत व २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंतच मजल मारू शकला.