आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२१ चा थरार सध्या सर्वत्र चर्चेत आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या महाकुंभाकडे संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा लागून आहेत. या टी२० विश्वचषकाचा सुपर-१२ टप्पा जसजसा पुढे जात आहे, तसतसा उत्साह वाढत आहे. या स्पर्धेत एकामागून एक विक्रमही नोंदवले जात आहेत. अशाच विक्रमांच्या यादीत सोमवारी (२५ ऑक्टोबर) गोलंदाजीचा मोठा विक्रम झाला.
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानने स्कॉटलंडविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. मुजीब उर रहमान हा आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा फिरकी गोलंदाज ठरला, ज्याने शानदार गोलंदाजीच्या जोरावर एका सामन्यात ५ बळी घेतले.
फिरकी गोलंदाजांना टी२० प्रकारामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु जेव्हा परिस्थिती त्यांच्या अनुकूल असते तेव्हा हे फिरकी गोलंदाज खूप धोकादायक ठरतात. मुजीबच्या आधीही २ फिरकी गोलंदाजांनी हे यश मिळवले आहे आणि आपण या लेखात त्या दोन गोलंदाजांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
१. मुजीब उर रहमान ( बांगलादेश वि. स्कॉटलंड, २०२१)
टी२० विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ कोणत्याही संघाला चकित करू शकतो. अफगाणिस्तानकडे फिरकी गोलंदाजीचे अत्यंत धोकादायक त्रिकूट आहे. पहिल्याच सामन्यात मुजीब उर रहमानने आपल्या जीवघेण्या गोलंदाजीने विरोधी संघाची कोंडी केली. अफगाणिस्तानने सोमवारी (२५ ऑक्टोबर) स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली. या सामन्यात मुजीब उर रहमानने ५ विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानने प्रथम खेळताना १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात मुजीबच्या गोलंदाजीच्या जोरावर स्कॉटलंडचा संघ अवघ्या ६० धावांत गारद झाला होता. मुजीब उर रहमानने ४ षटकात २० धावा देत ५ बळी घेतले. त्याचवेळी त्याचा साथीदार राशिद खाननेही ४ बळी घेतले.
२. रंगना हेराथ (श्रीलंका वि. न्यूझीलंड, २०१४)
श्रीलंकेच्या संघातून मुथय्या मुरलीधरनच्या बाहेर पडल्यानंतर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी रंगना हेराथच्या खांद्यावर आली. रंगना हेराथने आपल्या फिरकी गोलंदाजीने श्रीलंकेसाठी अनेक सामन्यांमध्ये मोठे योगदान दिले आहे. हेराथने श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये भरपूर विकेट घेतल्या आहेत, तर टी२० क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
सन २०१४ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत हेराथने न्यूझीलंडविरुद्ध ५ विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात श्रीलंकेला केवळ ११९ धावा करता आल्या. मात्र रंगना हेराथच्या धोकादायक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या ६० धावांत आटोपला होता. हेराथने ३.३ षटकात केवळ ३ धावा देत ५ बळी घेतले होते.
१. अजंथा मेंडिस ( श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, २०१२)
श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज अजंथा मेंडिसने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले, तेव्हा त्याची फिरकी गोलंदाजी सर्वांसाठी गूढ बनली होती. मेंडिसने आपल्या फिरकीने मोठ-मोठ्या फलंदाजांना पायचीत केले होते. त्याने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप प्रभावित केले आणि या काळात काही विक्रमही केले. अशाच प्रकारे, २०१२ मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकात मेंडिसने आश्चर्यकारक कामगिरी केली होती.
या टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात मेंडिसने झिम्बाब्वेविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली होती. या सामन्यात मेंडिसने केवळ ८ धावा देत ६ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४ गडी गमावून १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा डाव अवघ्या १०० धावांत आटोपला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आपल्या खराब फॉर्मविषयी वॉर्नरने दिली प्रतिक्रिया; ‘असा’ करतोय सराव
केवळ रोहितच नाही, तर ‘हे’ दोन भारतीय देखील टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेत शुन्यावर बाद
इंग्लडने बंद केली बांगला वाघांची डरकाळी; नोंदविला सलग दुसरा विजय