इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर, येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. भारतीय संघाने देखील ८ सप्टेंबर रोजी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली होती. या संघात शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांसारख्या बड्या खेळाडूंना संधी दिली गेली नव्हती. पण ही स्पर्धा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत भारतीय संघाला या संघात बदल करण्याची संधी आहे. १० ऑक्टोबरपर्यंत संघांना आपल्या संघात बदल करता येणार आहेत.
दरम्यान आयपीएल स्पर्धेत जर काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर त्यांना टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बोलवले जाऊ शकते. कोण आहेत ते भारतीय खेळाडू ज्यांचे पुनरागमन होऊ शकते, चला जाणून घेऊया.
१) शिखर धवन – ईशान किशन
ईशान किशनची आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, या संघात केएल राहुल आणि रिषभ पंतसारखे यष्टिरक्षक फलंदाज असताना ईशान किशनची गरज काय? परंतु जेव्हा संघाची निवड झाली तेव्हा स्पष्ट करण्यात आले की, ईशान किशन आणि रिषभ पंत हे मुख्य यष्टिरक्षक असणार आहे. म्हणजे रिषभ पंतचा बॅकअप सलामीवीर म्हणून ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.
त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्याने १४.६० च्या सरासरीने अवघ्या ७३ धावा केल्या आहेत. तर शिखर धवनने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ३८० धावा केल्या होत्या. जर त्याने हीच कामगिरी सुरू ठेवली तर ईशान किशनऐवजी शिखर धवनला संधी दिली जाऊ शकते.
२) दीपक चाहर – अक्षर पटेल
जेव्हा संघाची घोषणा झाली, तेव्हा चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला. या संघात दीपक चाहरचे नाव नव्हते. दीपक चाहरने गेल्या काही वर्षांपासून टी-२० क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतही चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना संघाला नवीन चेंडूने चांगली सुरुवात करून दिली होती. तरीदेखील त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तर अक्षर पटेलला मुख्य संघात स्थान देण्यात आले. जर दीपक चाहरने आगामी आयपीएल स्पर्धेत देखील चांगली कामगिरी केली तर त्याचा १५ सदस्यीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
३) टी नटराजन – मोहम्मद शमी
मोहम्मद शमीला टी-२० संघात स्थान देणे हा सर्वांसाठी आश्चर्यकारक निर्णय होता. कारण अनेकांना वाटले होते की, दिपक चाहर किंवा शार्दुल ठाकूरला संधी दिली जाईल. शमी अनुभवही खेळाडू असल्यामुळे त्याला या संघात स्थान मिळाले आहे. त्याने स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने निराशाजनक कामगिरी केली तर त्याला या संघातून काढून टाकण्यात येऊ शकते. त्याच्या ऐवजी टी नटराजनला संधी देण्यात येऊ शकते. कारण भारतीय संघात कुठल्याही डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली नाहीये. त्यामुळे टी नटराजन हे स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार, पाहा नावे
आयपीएल: २००८-२०२०, ‘या’ फलंदाजांनी जिंकलीय ऑरेंज कॅप, ‘हा’ धुरंधर विक्रमतोड ४ वेळा ठरलाय मानकरी
आयपीएल: २००८-२०२०, ‘या’ मातब्बर गोलंदाजांनी जिंकलीय पर्पल कॅप; एक भारतीय सलग २ वर्षे ठरलाय मानकरी