भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआनं शनिवारी (28 सप्टेंबर) या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेसाठी कसोटी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही खेळाडूंचं पुनरागमनही झालं. तर युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवला प्रथमच संधी मिळाली.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. याशिवाय वरुण चक्रवर्तीही परतला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात सहभागी झालेल्या अभिषेक शर्माला पुन्हा संधी मिळाली असून नितीशकुमार रेड्डी याचीही निवड झाली आहे. या सगळ्यात काही खेळाडू असे आहेत, ज्यांच्याकडे बीसीसीआयनं दुर्लक्ष केलं. या लेखात आपण अशा तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
(3) खलील अहमद – डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदला झिम्बाब्वे दौऱ्यावर संधी मिळाली होती. त्यानंतर त्याची श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेसाठीही निवड झाली होती. मात्र, आता या गोलंदाजाला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. खलीलनं आयपीएल 2024 मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. याशिवाय त्यानं अलीकडेच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये 9 विकेट घेतल्या होत्या. असं असतानाही निवड समितीनं त्याला संघात स्थान दिलं नाही.
(2) इशान किशन – यष्टिरक्षक फलंदाज इशान किशननं काही काळापूर्वी क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत चांगली कामगिरी केली. त्यानं प्रथम बुची बाबू स्पर्धेत शतक ठोकलं. यानंतर त्यानं दुलीप ट्रॉफीमध्येही शतक झळकावलं. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत त्याला भारतीय संघात संधी मिळेल, असं मानलं जात होतं. परंतु तसं झालं नाही.
(1) ऋतुराज गायकवाड – एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनलेल्या ऋतुराज गायकवाडची देखील बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड झाली नाही. ऋतुराज शेवटचा झिम्बाब्वे दौऱ्यात खेळला, जेथे त्यानं चांगली फलंदाजी केली होती. दुलीप ट्रॉफीमध्येही त्यानं चांगली कामगिरी केली. मात्र असं असूनही निवडकर्त्यांनी ऋतुराजची निवड केली नाही.
हेही वाचा –
राहुल द्रविडच्या मुलानंतर आणखी एका दिग्गजाच्या मुलाचा अंडर 19 संघात समावेश
‘थाला’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा; खास नियम लागू
ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधारपदी कायम