क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धेला मोठे महत्त्व आहे. आपल्या देशाकडून विश्वचषक जिंकता यावे हे स्वप्न जवळजवळ सर्वच क्रिकेटपटू पहातात. अगदी सचिन तेंडुलकरलाही ६ वी विश्वचषक स्पर्धा खेळताना विश्वविजेत्या संघाचा भाग होता आले.
आत्तापर्यंत सर्वाधिक विश्वचषक ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहेत. त्यांनी ५ विश्वचषक जिंकले आहेत. तर त्यांच्यापाठोपाठ भात आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी २ वेळा विश्वचषक जिंकला आहे.
भारताने पहिला विश्वचषक १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला. तर त्यानंतर भारताला दुसरा विश्वचषक जिंकण्यासाठी २८ वर्षे वाट पहावी लागली. भारताने दुसरा विश्वचषक २०११ ला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला.
विश्वचषक स्पर्धा म्हटलं की नेहमीच एका चांगल्या तयारीची संघाला गरज असते. त्यांना एक चूकही महागात पडू शकते. विश्वचषकात घेतलेले काही निर्णय अनेकदा महत्त्वाचे ठरतात. या निर्णयांमुळे संघाच्या कामगिरी मोठा फरक पडू शकतो.
विश्वचषकात अनेकदा उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत प्रवेश करुनही पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारताच्या बाबतीतही अनेकदा असे निर्णय महत्त्वाचे ठरले. यातील काही निर्णयांचा फटकाही भारताला बसला.
असे हे ३ निर्णय ज्याचा भारताला विश्वचषक स्पर्धेदरम्यान मोठा फटका बसला –
१९९६ च्या विश्वचषकात उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय –
१९९६ ला भारत – श्रीलंका संघात झालेला उपांत्य सामना अनेक क्रीडाप्रेमींच्या लक्षात असेल. हा सामना चाहत्यांनी स्टेडियममध्ये लावलेल्या आगीच्या घटनेमुळे गाजला होता.
१३ मार्चला कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या या महत्त्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्याआधी दिल्लीमध्ये या दोन संघात झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने २७२ धावांचे आव्हान सहज पार केले होते.
मात्र उपांत्य फेरीत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय भारतावरच भारी पडला. कारण प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंका संघाने ५० षटकात ८ बाद २५१ धावा करत भारताला २५२ धावांचे आव्हान दिले होते. महत्त्वाचा सामना असल्याने भारतावर मोठा दबाव होता. त्यात हा सामना भारतात होत होता.
या दबावाचा सामना भारतीय क्रिकेटपटूंना करता आला नाही. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताने नवज्योत सिंग सिद्धूची विकेट ८ धावांवरच गमावली. पण त्यानंतर सचिन तेंडूलकर आणि संजय मांजरेकरांनी भारताचा डाव सांभाळला. मात्र सचिन ६५ धावा करुन बाद झाला. त्यावेळी भारतीय संघ २ बाद ९९ धावा अशा स्थितीत होता. पण त्यानंतर भारताचा डाव ढासळला. पुढच्या काही षटकातच १२० धावात ८ विकेट्स अशी परिस्थिती भारतावर उद्भवली.
त्यामुळे चाहत्यांना वाटले आता भारताने हा सामना जिंकणे कठीण आहे. त्यामुळे चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. त्यांनी पाण्याच्या बॉटल्स मैदानावर फेकण्यास सुरुवात केली. ते पाहुन सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण स्टेडियममधील प्रेक्षक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी स्टेडियममध्येच आग लावली. यामध्ये काही आसनांनाही आग लागली.
या घटनेमुळे सामनाधिकाऱ्यांनी सामना त्याच परिस्थितीत थांबवला आणि काही वेळाने श्रीलंकेला विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे श्रीलंका अंतिम सामन्यात पोहचले. पुढे जाऊन श्रीलंकेने तो विश्वचषकही जिंकला.
२००३ च्या विश्वचषकात अनुभवी व्हीव्हीएस लक्ष्मणला वगळण्यात आले –
२००३ च्या विश्वचषकात अनुभवी व्हीव्हीएस लक्ष्मणला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्याऐवजी अष्टपैलू दिनेश मोंगियाला संधी देण्यात आली. लक्ष्मणला त्याचे खराब क्षेत्ररक्षणाच्या कारणाने संघात स्थान न दिल्याचे सांगण्यात आले. या कारणाममुळे बऱ्याच चर्चा त्यावेळी झाल्या होत्या.
विशेष म्हणजे विश्वचषकाआधी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेेत लक्ष्मणने ९९,६६ आणि ७१ अशा धावा केल्या होत्या. पण त्याला विश्वचषकासाठी संधी मिळाली नव्हती. हा निर्णय भारतासाठी घातक ठरला. कारण या विश्वचषकात भारताने जरी अंतिम सामना गाठला असला तरी मोंगियाची कामगिरी फार बरी नव्हती. त्याने नेदरलँड्सविरुद्ध सर्वाधिक ४२ धावा केल्या होत्या.
त्याने या विश्वचषकात ६ डावात फलंदाजी केली होती. अंतिम सामन्यातही तो १२ धावांवर बाद झाला. या विश्वचषकानंतर मात्र मोंगिया भारतीय संघात ये-जा करत राहिला. पण लक्ष्मणने भारताच्या वनडे संघात यशस्वी पुनरागमन केले. त्याने या विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ग्वाल्हेरला शतकी खेळी केली होती. नंतर भारताचा कर्णधार गांगुलीनेही लक्ष्मणला विश्वचषकात न खेळवण्याचा निर्णय चूकला असल्याचे मान्य केले.
२०१९ विश्वचषकात चौथा क्रमांकाचा फलंदाज निश्चित नसणे –
भारताला मागील अनेक महिन्यांपासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या भडसावत आहे. याच समस्येमुळे भारताला २०१९ विश्वचषकातही मोठा फटका बसला होता. या विश्वचषकात भारताने ९ सामन्यांमध्येच हार्दिक पंड्या, रिषभ पंत, विजय शंकर, केएल राहुल या तब्बल ४ फलंदाजांना या क्रमांकावर खेळवले.
त्यामुळे एक निश्चित फलंदाज या क्रमांकावर नसल्याने भारताला मोठे नुकसान झाले. उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळताना सुरुवातीलाच तीन विकेट्स गमावल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांंनी टीकून खेळण्याची गरज होती. परंतू मधल्या फळीतील चौथा क्रमांक सतत बदलत राहिल्याने अन्य क्रमांकावरील फलंदाजांच्या क्रमवारीतही बदल झाले. परिणामी भारताला त्याचा फटका बसला आणि भारताचे या विश्वचषकातून आव्हान संपूष्टात आले.
ट्रेडिंग घडामोडी –
चाहत्याने थेट क्रिकेटरला विचारले, तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे? क्रिकेटपटूने दिले असे काही उत्तर
…ह्या आहेत अभिलाषा म्हात्रे यांच्या महाराष्ट्रातील आवडत्या महिला कबड्डीपटू
वादामुळे क्रिकेट करियर संपलेले ५ क्रिकेटपटू