भारतीय संघात दाखल झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) अनेक मोठ-मोठे विक्रम केले आहेत. सलामीवीर म्हणून खेळताना त्याने वनडे सामन्यात ५८ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्माने वनडेमध्ये तीन वेळा दुहेरी शतक झळकावले आहे. रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वाधिक धावांचा विक्रमही आहे.
खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मोठी खेळी खेळणे ही रोहित शर्माची खासियत आहे. रोहित शर्माने मारलेले षटकार बघण्यासारखे असतात. प्रेक्षकांना त्याचे हवेतील मारलेले षटकार पाहायला खूप आवडतात. भारतीय संघात असे काही तरुण खेळाडू आहेत ज्यांच्याकडे रोहितप्रमाणेच फलंदाजी करण्याची क्षमता आहे. कोण आहेत असे तीन खेळाडू चला पाहू –
रोहित शर्मा सारखे फलंदाजी करू शकतात असे ३ भारतीय खेळाडू
१. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
या युवा फलंदाजाने २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने अनेकदा आक्रमक खेळताना चांगल्या खेळी केल्या आहेत. आयपीएलमध्ये देखील त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी उत्तम कामगिरी बजावली आहे.
पृथ्वीने आत्तापर्यंत भारतासाठी ३ कसोटी व ३ वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याच्यात आक्रमक खेळण्याची असलेली क्षमता असल्याने तो रोहित शर्माची जागा घेऊ शकतो.
२. शुभमन गिल (Shubman Gill)
२०१८ ला झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात शुबमन गिल चमकला. त्याने त्यानंतरही आयपीएल तसेच देशांतर्गत क्रिकेट आणि भारत अ संघाकडून दमदार कामगिरी करताना त्याच्यातील प्रतिभा दाखवली आहे. त्याच्याकडेही रोहित शर्मासारखे मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यालाही पुढे रोहित शर्माची जागा मिळू शकते.
३. रिषभ पंत (Rishabh Pant)
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे आक्रमक खेळण्याची क्षमता आहे, हे आता सर्वांनाच माहिती आहे. त्याने अनेकदा अशा खेळी केल्या आहेत. पण त्याच्यावर अनेकदा चूकीचे फटके मारुन बाद झाल्याने टिका झाली आहे. पण या चूका सुधारुन तो जर खेळला तर त्याच्यात वादळी खेळी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो देखील रोहित प्रमाणे मोठ्या खेळी करु शकतो. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ कसोटी, १६ वनडे व २८ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने १५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच २ शतके केली आहेत.