भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 474 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथनं शतक झळकावलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात, भारतानं आपल्या पहिल्या डावात 164 धावांत 5 विकेट गमावल्या असून संघावर पुन्हा एकदा फॉलोऑनचा धोका निर्माण झाला आहे. या कसोटीत एक नवा रेकॉर्ड बनला. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या दिवशी 300 हून अधिक धावा झाल्या, जे तब्बल 20 वर्षांनंतर घडलं आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 1910/11 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात 300 पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या. त्यानंतर 1924/25 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान हे घडलं होतं. त्यानंतर तब्बल 78 वर्षांनंतर 2003/04 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सामन्यात हा पराक्रम घडला. आता 20 वर्षांनंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात 300 हून अधिक धावा झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियानं शुक्रवारी 311/6 या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. संघाचा पहिला डाव 474 धावांवर आटोपला. यानंतर भारतानं 5 विकेट गमावून 164 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत (6*) आणि रवींद्र जडेजा (4*) धावा करून खेळत होते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 4 गडी गमावून 163 धावा केल्या तर भारतानं 5 विकेट गमावून 164 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे खेळाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांनी मिळून एकूण 327 धावा केल्या.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पहिल्या दोन दिवसात 300+ धावा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका 1910/11
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड 1924/25
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2003/04
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2024/25
हेही वाचा –
हा आहे सचिनचा दर्जा! मेलबर्न कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियात मिळाला विशेष सन्मान
मोहम्मद सिराजला ‘ड्रॉप’ करा, दिग्गज क्रिकेटपटू लाईव्ह मॅचदरम्यान संतापले!
टीम इंडियाची कमाल कामगिरी! वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश