पुणे। भोपाळ आणि होशिंगाबाद या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात ही स्पर्धा सुरू आहे.
या स्पर्धेतील सुपर-५ गटात शुक्रवारी झालेल्या पहिल्या लढतीत होशिंगाबाद संघाने चंदीगड संघावर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. यात आठव्याच मिनिटाला सुनील चौधरीने गोल करून चंदीगड संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यांचा हा आघाडीचा आनंद फार वेळ टिकला नाही. दोन मिनिटानंतर एम. सरताज याने गोल करून होशिंगाबाद संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरपर्यंत १-१ ही बरोबरी कायम होती.
यानंतर ३४व्या मिनिटाला सोनू कुमारने गोल करून होशिंगाबाद संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ४० व्या मिनिटाला नरेश राठीने गोल करून होशिंगाबाद संघाची आघाडी ३-१ने भक्कम केली. लढतीच्या ५९व्या मिनिटाला पुनीत सिंगने गोल करून चंदीगड संघाची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा निकालावर परिणाम झाला नाही. होशिंगाबाद संघाने ३-२ अशी आघाडी कायम राखून बाजी मारली.
यानंतर झालेल्या दुसऱ्या लढतीत भोपाळ संघाने उत्तर प्रदेश संघावर ७-०ने सहज मात केली. यात भोपाळ संघाकडून बाबू खान (२, १४ मि.) आणि शाबाद खान (९, २५ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर अहमद अली (५ मि.), सद्दाम खान (४० मि.) आणि महंमद समीर (४९ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.