भारतानं नुकत्याच जिंकलेल्या टी20 विश्वचषकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. तो टीम इंडियासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. अर्शदीपनं गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मात्र अद्याप त्याला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही.
दरम्यान, भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी अर्शदीपच्या कसोटी पदार्पणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला ऑस्ट्रेलियात रेड बॉल फॉरमॅटमध्ये भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताला या वर्षाच्या शेवटी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. या मालिकेत पाच कसोटी सामने खेळले जातील.
2022 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अर्शदीप सिंगबाबत पारस म्हांब्रे म्हणाले की, परिस्थितीनुसार चौथ्या वेगवान गोलंदाजाची आवश्यकता असेल तर त्याला ऑस्ट्रेलियात संधी मिळू शकते. मात्र म्हांब्रे यांनी अर्शदीपला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्याला लाल चेंडूनं गोलंदाजीवर अधिक नियंत्रण मिळवता येईल.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पारस म्हांब्रे म्हणाले, “अर्शदीपचं पदार्पण परिस्थितीवर अवलंबून आहे. जर ऑस्ट्रेलियात आपण चार वेगवान गोलंदाजांसह खेळलो, तर त्याला संधी मिळेल. भारतात हे करणं खूप अवघड आहे. पण मला वाटतं की, त्यानं अजून देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही काळ खेळायला हवं. यामुळे त्याला त्याच्या स्विंगवर नियंत्रण ठेवण्यात आणि त्याचा फिटनेस राखण्यास मदत होईल.”
अर्शदीप सिंगनं भारतासाठी आतापर्यंत 6 एकदिवसीय आणि 52 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावे एकदिवसीय सामन्यात 10 आणि टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 79 बळी आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अर्शदीपनं 16 सामन्यांमध्ये 49 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या
रिकी पाँटिंगच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ! म्हणाले.., हा युवा खेळाडू होणार जागितक क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार
भारताच्या माजी क्रिकेटपटूचा गडबड घोटाळा! प्रशिक्षकाच्या मदतीनं केली वयात फसवणूक