क्रिकेटमध्ये जेव्हाही भागीदारीच्या विक्रमाची चर्चा केली जाते, तेव्हा त्यामध्ये कोणत्याही दोन फलंदाजांनी केलेल्या धावांच्या भागीदारीला प्राधान्य दिले जाते. तसेच दोन गोलंदाजांनी एकत्र मिळून घेतलेल्या विकेट्सची चर्चा होते. परंतु असे असले तरीही कोणत्याही गोलंदाजाने घेतलेल्या विकेटमध्ये एका क्षेत्ररक्षकाचेही तितकेच महत्त्वपूर्ण योगदान असते.
या लेखात आपण कसोटी क्रिकेटमधील गोलंदाज- क्षेत्ररक्षकांच्या त्या ४ जोड्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी एकत्र मिळून ५० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये ५० पेक्षाही अधिक झेल (विकेट्स) घेणाऱ्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या ४ जोड्या- 4 Bowlers Fielder combo most Catches Test Cricket
१. मुथय्या मुरलीधरन आणि माहेला जयवर्धने (संघ- श्रीलंका, विकेट्स- ७७)
श्रीलंका संघाचा फिरकीपटू गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) नावावर कसोटीत सर्वाधिक ८०० विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्याच्या या विकेट्सपैकी ७७ विकेट्समध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज माहेला जयवर्धनेचे (Mahela Jayawardene) योगदान राहिले आहे. जयवर्धनेने आपल्या १४९ कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत एकूण २०५ झेल झेलले आहेत. कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत जयवर्धनेचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने घेतलेल्या २०५ झेलांमध्ये जयवर्धनेला ७७ वेळा ही संधी १३३ कसोटी सामने खेळणाऱ्या फिरकीचा जादूगार मुरलीधरनच्या गोलंदाजीवर मिळाली आहे.
२. अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड (संघ- भारत, विकेट्स- ५५)
भारतीय संघाकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावावर आहे. त्याच्या या विकेट्समध्ये राहुल द्रविडने (Rahul Dravid) ५५ वेळा झेल झेलले आहेत. विशेष म्हणजे झेल झेलणाऱ्या खेळाडूंच्या यादीत द्रविड अव्वल क्रमांकावर आहे. त्याने १६४ कसोटी सामने खेळताना एकूण २१० झेल झेलले आहेत.
तसेच कुंबळेने १३२ कसोटी सामने खेळताना एकूण ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. तो जागतिक क्रिकेटमध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
३. शेन वॉर्न आणि मार्क टेलर (संंघ- ऑस्ट्रेलिया, विकेट्स- ५१)
जागतिक क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne) आणि मार्क टेलरच्या (Mark Taylor) जोडीचेही या यादीत महत्त्वपूर्ण स्थान आहे. वॉर्न आणि टेलरच्या भागीदारीने एकूण ५१ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी सामने खेळणाऱ्या वॉर्नने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये वॉर्नचा दुसरा क्रमांक लागतो. तसेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज टेलरने १०४ कसोटी सामने खेळताा १५७ झेल झेलले आहेत.
४. हरभजन सिंग आणि राहुल द्रविड (संंघ- भारत, विकेट्स- ५१)
गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या भागीदारीच्या यादीत ५० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथी आणि शेवटची जोडी भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि राहुल द्रविडची (Rahul Dravid) आहे. भारताकडून १०३ कसोटी सामन्यात ४१७ विकेट्स घेण्याचा कारनामा करणाऱ्या हरभजनला ५१ वेळा द्रविडची साथ मिळाली आहे. द्रविडने १६४ कसोटी सामने खेळताना एकूण २१० झेल झेलले आहेत. त्यातील ५५ झेल त्याने कुंबळे आणि ५१ झेल हरभजनच्या गोलंदाजीवर घेतले आहेत.