देशात सध्या कोरोना विषाणूचा धुमाकुळ सुरु आहे. भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा अगदी 1 लाखांच्या पार गेला आहे. त्यामुळेच जनसामान्यांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु केला आहे.
पहिल्या तीन टप्प्यातील लॉकडाऊनपेक्षा या टप्प्यातील लॉकडाऊन काहीसा दिलासादायक म्हणावा लागेल. याचे कारण केंद्र सरकारने चौथ्यांदा लॉकडाऊनची घोषणा करताना खेळाडूंसाठी मैदाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय क्रिडा क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे. याच निर्णयामुळे या वर्षाअखेरीस इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे आयोजन करण्याच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत.
“खेळाची मैदाने खुली करण्यात आल्याने सध्या देशातील ज्या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. अथवा कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, अशा ठिकाणी आयपीएलचे सामने खेळवता येऊ शकतात किंवा नाही, याची चाचपणी सुरु असल्याचे बोलले जात आहे.”
देशात अशी अनेक शहरे आहेत, जिथे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी नगण्य आहे. तेव्हा अशा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जाऊ शकतात. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) असा कोणताही निर्णय घेण्याची सध्या घाई करणार नसल्याचे म्हटले आहे.
या लेखात आपण देशातील अशी चार शहरे आणि सदर ठिकाणची क्रिकेटची मैदाने पाहणार आहोत, जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी नगण्य आहे. तसेच तिथे योग्य ती खबरदारी घेतल्यास आयपीएलचे सामने खेळवता येऊ शकतात.
क्रमांक – 1
- गुहावटी शहर
मैदान : डॉ. भूपेन हजारिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम किंवा बरसापारा स्टेडियम
ईशान्य भारतातील हे सुंदर शहर आसाम राज्याची राजधानी आहे. या शहरातील कोरोनाची परिस्थिती तशी नियंत्रणात असून येथे अतिशय कमी संख्यने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिस्थितीत गुहावटीमध्ये आयपीएलचे सामने खेळवता येऊ शकतात.
गुहावटीच्या बरसापारा मैदानात हे सामने खेळवता येतील. अतिशय विस्तीर्ण मैदान असलेले हे स्टेडियम अनेक सोईसुविधांची परिपुर्ण आहे. तसेच या ठिकाणी अनेकदा आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत.
क्रमांक – 2
- डेहराडून शहर
मैदान : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
आयपीएलचे सामने खेळवता येऊ शकतील, असे दुसरे शहर म्हणजे उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडून शहर. या शहरातही कोरोनाचे अतिशय कमी रुग्ण आढळले आहेत. तसे या शहरात कोरोनाचा प्रसार देखील नियंत्रीत करण्यात आला आहे. संपुर्ण डेहराडूनमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा तिहेरी अंकापर्यंत देखील पोहचू शकलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी आयपीएलचे सामने खेळवता येऊ शकतात.
डेहराडूनमध्ये भारतातील एक सुंदर क्रिकेटचे मैदान आहे. ‘राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान’ या नावाने परिचित असलेले हे मैदान आयपीएलच्या सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकेल. या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आलेले आहेत. तसेच हे मैदान शहरापासून दूर असले तरिही सर्व सोईसुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था असलेले आहे.
क्रमांक – 3
- रायपूर शहर
मैदान : शहीद वीर नारायन सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम किंवा नवीन रायपूर स्टेडियम
छत्तीसगड राज्याची राजधानी असलेले रायपूर शहर अद्याप कोरोनाच्या मगरमिठीपासून शेकडो अंतर दूर आहे. या शहराने कोरोनावर योग्य नियंत्रण मिळवले असून या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या या संकटात रायपूरमध्ये आयपीएलचे सामने आयोजीत करता येऊ शकतात.
शहीद वीर नारायन सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम किंवा रायपूर स्टेडियम नावाने ओळखले जाणारे हे मैदान क्रिकेट सामन्यांसाठी आवश्यक त्या सर्वसोईसुविधा उपसब्ध असलेले आहे. तसेच या ठिकाणी अनेकदा क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने खेळवण्यात आले आहेत.
क्रमांक – 4
- धरमशाला शहर
मैदान : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम किंवा धरमशाला स्टेडियम
हिमाचल प्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर असलेले ‘धरमशाला’ हे तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांचे घर म्हणून प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेश या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण अगदी मर्यादित आहे. त्यातही धरमशाला या शहरात तर कोरोनाबाधितांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात धरमशाला शहरातही आयपीएलचे सामने खेळवता येऊ शकतात.
धरमशाला येथे ‘हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम’ नावाने एक आंतरराष्ट्रीय मैदान आहे. या मैदानावर क्रिकेटचे अनेक महत्वपूर्ण सामने खेळवण्यात आले आहेत. तसेच निसर्गाच्या कुशीत असलेले हे मैदान अनेक खेळाडूंच्या आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत, या ठिकाणी देखील आयपीएलचे सामने खेळवता येतील.