बरोबर १४३ वर्षींपूर्वी १८७७ साली जगातील पहिला कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. तेव्हापासून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक रोमांचक सामने खेळले गेले. तसेच अनेक बदलही झाले. पण कसोटी क्रिकेटमध्ये आजही न बदललेली गोष्ट म्हणजे गोलंदाजांना घ्याव्या लागणाऱ्या २० विकेट्स आणि फलंदाजांना करावी लागणारी संयमी फलंदाजी.
कसोटी सामन्यात अनेकदा एखादा संघ पूर्ण दिवस टिच्चून फलंदाजी करतानाही दिसतो. तसेच खूप क्वचित दोन डाव एका दिवसात संपल्याचे कसोटीत पहायला मिळते.
विशेष म्हणजे १४३ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात केवळ ४ वेळाच असे झाले आहे की एक संघ एकाच दिवसात दोन्ही डावात सर्वबाद झाला आहे. नमुद करण्यासारखी गोष्ट म्हणजे २० व्या शतकात केवळ अशी घटना एकदाच घडली आहे. तर २१ व्या शतकाच्या पहिल्या २० वर्षातच अशी घटना ३ वेळा घडली आहे. या ४ सामन्यांचा घेतलेला हा आढावा –
एक संघ एकाच दिवसात दोन्ही डावात सर्वबाद झाल्याच्या घटना –
१. भारत (५८ धावा आणि ८२ धावा) – १९५२
१७ ते १९ जूलै १९५२ ला मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध भारत संघात कसोटी सामना पार पडला होता. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिला डावात जवळजवळ अडीच दिवस फलंदाजी केली.
इंग्लंडकडून कर्णधार लिओनार्ज हटनने १०४ धावांची शतकी खेळी केली. तसेच पिटर मे (६९) आणि गॉडफ्रे इव्हान(७१) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव तिसऱ्या दिवशी ९ बाद ३४७ धावांवर घोषित केला.
तिसऱ्या दिवशी भारतीय संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारतीय फलंदाज इंग्लंडच्या माऱ्यासमोर टिकाव धरु शकले नाहीत. भारताचा पहिला डाव केवळ ५८ धावांवर तिसऱ्याच दिवशी संपुष्टात आला. भारताकडून केवळ कर्णधार विजय हजारे(१६) आणि विजय मांजरेकर (२२) यांनाच दोनआकडी धावसंख्या पार करता आली. इंग्लंडकडून पहिल्या डावात फ्रेड ट्रूमॅनने ८ विकेट्स घेतल्या. भारताला इंग्लंडने फॉलोऑन दिला.
त्यामुळे लगेचच पुन्हा भारताला फलंदाजीला यावे लागले. दुसऱ्या डावातही भारताची तशीच आवस्था राहिली. भारताचा दुसरा डावही तिसरा दिवस संपण्याच्या आधीच केवळ ८२ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून ऍलेक बेडसर यांनी सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर भारताकडून या डावात हेमू अधिकारी(२७), विजय हजारे(१६) आणि खोखन सेन(१३) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.
हा सामना इंग्लंडने एक डाव आणि २०७ धावांनी जिंकला. कसोटीमध्ये एकाच दिवसाच एक संघ दोन्ही डावात सर्वबाद होण्याची ही पहिली वेळ होती.
२. झिम्बाब्वे (५९ धावा आणि ९९ धावा) – २००५
ऑगस्ट २००५ ला हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वेचा संघ दोन्ही डावात सर्वबाद झाला होता. ही २१ व्या शतकात एक संघ एकाच दिवसात दोन्ही डावात सर्वबाद होण्याची पहिली वेळ होती.
त्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ४५२ धावांवर पहिला डाव पहिल्याच दिवशी घोषित केला होता. न्यूझीलंडकडून ब्रेंडन मॅक्यूलम (१११) आणि डॅनिएल विट्टोरीने (१२७) शतकी खेळी केली होती. तर कर्णधार स्टिफन फ्लेमिंगने (७३) अर्धशतक केले होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वे संघ फंलदाजीला आला. परंतू त्यांना न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर टिकाव धरता आला नाही. त्यांचा पहिला डाव केवळ ३० षटकांच्या आतच ५९ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून ब्रेंडन टेलर(१०) आणि स्टुअर्ट कार्लिले(२०) यांनाच २ आकडा धावसंख्या पार करता आली. त्यामुळे न्यूझीलंडने त्यांना फॉलोऑन दिला.
पण परिस्थिती काही बदलली नाही. झिम्बाब्वेचा दुसरा डावही केवळ ९९ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून हॅमिल्टन मसाकाद्झाने ४२ धावा करत झुंज दिली. पण अन्य फलंदाजांना खास काही करण्यात अपयश आले. न्यूझीलंडकडून या सामन्यात विट्टोरीने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. हा सामना न्यूझीलंडने एक डाव आणि २९४ धावांनी जिंकला.
३. झिम्बाब्वे (५१ धावा आणि १४३ धावा) – २०१२
योगायोग म्हणजे ७ वर्षांनंतर जानेवारी २०१२ला जेव्हा नेपियरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झिम्बाब्वे संघात कसोटी सामना झाला तेव्हा पुन्हा एकदा झिम्बाब्वे संघ एकाच दिवसात दोन्ही डावात सर्वबाद झाला होता. कसोटीमध्ये एकाच दिवसात दोन्ही डावात सर्वबाद होण्याची झिम्बाब्वेची ही दुसरी वेळ होती.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली होती. त्यांनी पहिल्या दिवशी ३०० धावांचा टप्पा ओलांडला होता. पण दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने केवळ १५ षटकांचा खेळ झाला. पण तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने त्यांचा पहिला डाव ७ बाद ४९५ धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून रॉस टेलरने(१२२) आणि बीजे वॉटलिंगने(१०२*) शतकी खेळी केल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या झिम्बाब्वेला पहिल्या डावात केवळ ५१ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून फक्त माल्कम वॉलरने २३ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. न्यूझीलंडने त्यांना या सामन्यात फॉलोऑन दिला.
दुसऱ्या डावात झिम्बाब्वेने थोडा बरा खेळ केला असला तरी त्यांचा दुसरा डावही तिसऱ्याच दिवशी १४३ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून केवळ रेगिस चकब्वाने ६३ धावांची अर्धशतकी खेळी करत एकाकी लढत दिली. मात्र अन्य खेळाडू मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून या सामन्यात ख्रिस मार्टिनने सर्वाधिक ८ विकेट्स घेतल्या. हा सामना न्यूझीलंडने एक डाव ३०१ धावांनी जिंकला.
४. अफगाणिस्तान (१०९ धावा आणि १०३ धावा) – २०१८
कसोटी क्रिकेटमधील पहिलाच सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानचा संघ भारताविरुद्ध दुसऱ्या दिवशी दोन्ही डावात सर्वबाद झाला होता. जून २०१८ ला बंगळुरुला झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या. भारताचा हा डाव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी संपुष्टात आला. भारताकडून शिखर धवन(१०७) आणि मुरली विजयने(१०५) शतके केली होती.
दुसऱ्या दिवशी जेव्हा अफगाणिस्तान पहिल्या डावात फलंदाजीला उतरला तेव्हा त्यांचा पहिला डाव २७.५ षटकात १०९ धावांवरच संपुष्टात आला. त्यांच्याकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक २४ धावा केल्या. भारताने अफगाणिस्तानला फॉलोऑन दिला.
पण फॉलोऑननंतरही अफगाणिस्तानचा दुसरा डावही दुसऱ्याच दिवशी ३८.४ षटकात १०३ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून कर्णधार असघर स्टॅनिकझाई(२५) आणि हशमतुल्लाह शाहिदीने(३६*) थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनी मिळून ५ व्या विकेटसाठी ३७ धावांची भागिदारी रचली. त्यांच्याव्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या अन्य फलंदाजांना अनुभवी भारतीय गोलंदाजीसमोर टीकाव धरता आला नाही. भारताने हा सामना एक डाव २६२ धावांनी जिंकला.
ट्रेंडिंग लेख –
–भारतीय क्रिकेटपटूंनी स्लेजिंग केलेल्या ५ घटना, ज्याची आजही होते चर्चा
-रोहितच्या २६४ धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेले ५ खेळाडू
-खूप जास्त अपेक्षा असताना भ्रमनिरास केलेले ७ क्रिकेटपटू