इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात २९ सामने झाल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच स्पर्धेतील उर्वरित ३१ सामने हे युएईमध्ये पार सुरू आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्स संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.
२१ सप्टेंबर रोजी पंजाब किंग्स संघाची लढत राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध रंगणार आहे. या संघात एकापेक्षा एक दमदार खेळाडू आहेत. ज्यामुळे कुठल्या परदेशी खेळाडूंना या संघात संधी द्यावी, हा विचार करून केएल राहुलची चिंता वाढली असेल. चला तर जाणून घेऊया, कुठल्या ४ परदेशी खेळाडूंना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते?
१) नाथन एलिस : ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस हा बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतल्यानंतर चर्चेत आला होता. त्यानंतर बिग बॅश लीगमध्ये देखील हा गोलंदाज चांगलाच चमकला होता. त्यामुळे रिले मेरेडिथने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर नाथन एलिसला पंजाब किंग्ज संघात संधी देण्यात आली होती. एलिस अंतिम षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते.
२) फेबीअन एलेन : वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू फेबीअन एलेनला राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. एलेन एक अप्रतिम अष्टपैलूसह एक उत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे. युएईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे फेबीअन एलेन या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करू शकतो. तसेच तो फलंदाजीला येऊन मोठे फटके देखील खेळू शकतो. त्यामुळे त्याला राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते.
३) निकोलस पुरन : टी-२० क्रिकेटमध्ये निकोलस पुरन विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. परंतु आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी आले होते. तो चार वेळेस शून्य धावांवर माघारी परतला होता. तरीही दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात निकोलस पुरनला संधी दिली जाऊ शकते. कारण तो अनुभवी फलंदाज आहे, ज्यामुळे तो मध्यक्रमात मोठी खेळी करू शकतो. निकोलस पुरनने नुकत्याच संपन्न झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत तुफान फटकेबाजी केली होती. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये तो पंजाब किंग्स संघासाठी चांगली कामगिरी करणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
४) ख्रिस गेल : टी-२० क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. गेलने देखील युएईमध्ये हजेरी लावली आहे. तसेच तो राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळणार हे जवळ जवळ निश्चित आहे. त्यातही आज त्याचा वाढदिवस असल्याने पंजाब किंग्ज संघ त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवत विशेष भेट देण्याच्या विचारात असेल. परंतु तो या सामन्यात सलामी फलंदाज म्हणून खेळणार की, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार हे अजूनही निश्चित नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या-
‘किंग’ कोहली सोडणार आरसीबीचं ‘सिंहासन’; अमूलचे खास कॅप्शनसह लक्षवेधी कार्टून, तुम्हालाही आवडेल
मन में लड्डू फुटा!! डगआऊटमध्ये आरसीबीच्या खेळाडूचं सुरू होतं भलतचं काही, फोटो भन्नाट व्हायरल
केकेआरविरुद्धच्या मानहानीकारक पराभवाने विराटला आली जाग; म्हणाला, ‘आता माझे डोळे उघडले’