पार्ल। शुक्रवारी (२१ जानेवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना बोलंड पार्क येथे पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतापेक्षा सर्वच क्षेत्रात वरचढ ठरल्याचेच दिसले.
भारताचा पराभव
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २८७ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून रिषभ पंतने ८५ धावांची खेळी केली, तर केएल राहुलने ५५ धावांची खेळी केली. तसेच तळात फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने ४० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून तब्राईज शम्सीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
तसेच भारताने दिलेल्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने जानेमन मलान आणि क्विंटॉन डी कॉक यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ४८.१ षटकात ३ विकेट्स गमावत २८८ धावा करत सामना जिंकला. मलानने ९१ धावांची, तर डी कॉकने ७८ धावांनी खेळी केली. त्यांना कर्णधार तेंबा बावूमा (३५), एडेन मार्करम (३७*) आणि रस्सी वॅन डर ड्यूसेन (३७*) यांनी चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूर यांनी मिळून प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने मालिकाही गमवावी लागली आहे. दरम्यान, आपण या लेखातून भारताच्या पराभवाची ४ कारणे पाहू
१. भारताचे अनुभवी फलंदाज अपयशी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे भारतीय संघाला केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली सारख्या अनुभवी फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, या तिघांनाही अपेक्षेवर खरे उतरता आले नाही. कर्णधार केएल राहुलने अर्धशतक केले, मात्र, त्यानंतर त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तो खेळपट्टीवर स्थिरवल्यानंतर बाद झाला. तसेच या सामन्यात शिखर धवन आणि विराट कोहली देखील खास काही करू शकले नाहीत. शिखर २९ धावांवर आणि विराट शून्यावर बाद झाला. त्यामुळे युवा खेळाडूंवर दबाव वाढला.
२. फलंदाजांची मधली फळी कोलमडली
पहिल्या वनडे प्रमाणेच दुसऱ्या वनडेतही भारताच्या मधल्या फळीला आवश्यक तसा दबाव हाताळता आला नाही. केवळ रिषभ पंतने तुफानी खेळ करत भारताचा डाव सांभाळला. मात्र, श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर या दोघांनाही मोठा हातभार लावता आला नाही. श्रेयस केवळ ११ आणि वेंकटेश २२ धावा करून बाद झाले. या दोघांनाही अंतिम ११ जणांच्या संघात मिळालेल्या जागेचा फायदा घेण्यात अपयश आले. त्यामुळे हे देखील भारताच्या पराभवाचे एक कारण म्हटले जाऊ शकते.
अधिक वाचा – पहिल्या सामन्यात कोठे शिंकली माशी? जाणून घ्या भारताच्या पराभवाची चार कारणे
३. केएल राहुलचे निर्णय
कर्णधार केएल राहुलही कर्णधारपद सांभाळताना थोडा गोंधळलेला वाटला. मैदानावरील त्याचे काही निर्णय चकीत करणारे होते. त्याने विकेट घेतल्यानंतर शार्दुलला लगेचच गोलंदाजी दिली नाही. तसेच त्याने शार्दुलऐवजी वेंकटेश अय्यरला गोलंदाजीला आणले, यामुळे त्याच्या निर्णयात आक्रमकता जाणवली नाही. त्याने विकेट घेण्याच्या हेतूने गोलंदाजीत बदल करायला हवे होते.
व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी
४. गोलंदाजांकडून निराशा
केवळ फलंदाजांकडूनच नाही, तर या सामन्यात गोलंदाजांकडूनही निराशा झाली. भारताकडे भुवनेश्वर कुमार, आर अश्विनसारखे गोलंदाज आहेत. पण या दोघांनीही विकेटही घेतली नाही आणि ६० पेक्षा अधिक धावाही दिल्या. भुवनेश्वरने तर पहिल्या ४ षटकातच ४० धावा दिल्या होत्या. तसेच शार्दुल ठाकूर, वेंकटेश अय्यर यांनाही काही कमाल करता आली नाही. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलने धावा कमी दिल्या, मात्र त्यांना एकापेक्षा अधिक विकेट्स घेण्यात अपयश आले.
भारताच्या गोलंदाजांवर दक्षिण आफ्रिकेच्या जानेमन मलान आणि क्विंटन डी कॉकने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखायला सुरुवात केल्याने भारतीय गोलंदाज दबावातून बाहेर येताना दिसले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
भुवीच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका आणि विकेट्स यांच जरा वाकडंच! दुसऱ्या वनडे नकोसा विश्वविक्रम नावावर