वनडे सामन्यात आतापर्यंत १ धावांनी ३१ वेळा विजय नोंदविले गेले आहेत. १९७६ मध्ये प्रथमच न्यूझीलंडने सियालकोट वनडे सामन्यात पाकिस्तानला १ धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ वेळा वनडे सामने १ धावांनी जिंकले आहेत. या व्यतिरिक्त भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी वनडेमध्ये प्रत्येकी ४ वेळा १ धावांनी विजय मिळवला आहे.
वेस्ट इंडीजने ३ वनडे सामने १ धावांनी जिंकले आहेत, तर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने दोनदा हा कारनामा केला आहे. झिम्बाब्वे, आयर्लंड, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांनी वनडे सामन्यात एकदा १ धावांनी विजय मिळवण्याचा विक्रम नोंदविला आहे. हा विक्रम करणारा शेवटचा संघ नेपाळ होता, त्याने २०१८ मध्ये नेदरलँड्सचा १ धावांनी पराभव केला.
भारतीय संघाने आतापर्यंत एक धावांनी वनडे सामना जिंकलेल्या त्या चार सामन्यांबद्दल जाणून घेऊया-
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (६ मार्च १९९०, वेलिंग्टन)
रॉथमॅन चषक तिरंगी मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारताने पहिल्यांदा वनडे सामना १ धावांनी जिंकला. वेलिंग्टनमध्ये भारताने न्यूझीलंडला १ धावांनी पराभूत केले. ४९ षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने कपिल देवच्या ४६ धावांच्या मदतीने २२१ धावा फटकावल्या. त्यास उत्तर देताना यजमान न्यूझीलंड संघ ४८.५ षटकांत २२० धावा करुन सर्वबाद झाला. त्या सामन्यात मनोज प्रभाकरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. कपिल देवनेही दोन विकेट्स घेतल्या आणि त्याला अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
भारत विरुद्ध श्रीलंका (२५ जुलै १९९३, कोलंबो)
जुलै १९९३ मध्ये भारत श्रीलंकेच्या दौर्यावर गेला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात यजमानांना १ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ‘सामनावीर’ मोहम्मद अझरुद्दीनच्या ५३ धावांच्या जोरावर २१२/८ धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने ४९.२ षटकांत २११ धावा करून सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या अखेरच्या आठ विकेट्स फक्त ५० धावांच्या आत पडल्या. या सामन्यात मोहम्मद अझरुद्दीनने कर्णधारपदाला साजेसा असा खेळ केला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२१ फेब्रुवारी २०१०, जयपूर)
फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्यावर आला होता. या दौऱ्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात जयपूर येथे भारताने त्यांना १ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने सुरेश रैनाच्या ५८ आणि वीरेंद्र सेहवागच्या धुवांधार ४६ धावांच्या मदतीने २९८/९ धावा केल्या. दिनेश कार्तिकनेही ४४ धावांची उपयुक्त खेळी साकारली.
प्रत्युत्तरादाखल, जॅक कॅलिसने ८९, वेन पार्नेल ४९ आणि डेल स्टेन ३५ धावा केल्या. वेन आणि स्टेन यांच्यात नवव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी झाली, परंतु ते संघाला विजयी करू शकले नाहीत. संपूर्ण संघ ५० षटकांत २९७ धावा करुन सर्वबाद झाला. अष्टपैलू कामगिरी आणि चांगल्या गोलंदाजीसाठी रवींद्र जडेजाला (२२ धावा आणि २९/२) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१५ जानेवारी २०११, जोहान्सबर्ग)
जानेवारी २०११ मध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसरा वनडे सामना जोहान्सबर्गमध्ये खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ १९० धावा करू शकला. त्यात युवराज सिंगने सर्वाधिक ५३ धावा केल्या.
प्रत्युत्तरात कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने ७७ धावा केल्या, परंतु ४३ षटकांत दक्षिण आफ्रिका संघ १८९ धावांवर सर्वबाद झाला. मुनाफ पटेलने ४/४९ अशी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
ट्रेंडिंग लेख –
३ असे भारतीय खेळाडू जे आयपीएलमध्ये खेळले हे अनेकांना माहितीही नसेल…
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले
महत्त्वाच्या बातम्या –
१२ वर्षांनंतर अनिल कुंबळेने ‘मंकीगेट’ प्रकरणाबाबत केला मोठा खुलासा
५०० विकेट्स पूर्ण करणारा ब्रॉड घरच्या मैदानावर आहे दादा; कारणेही आहेत तशीच
भज्जीने इंस्टाग्रामवर शेअर केलंय सुरेश रैना हरवल्याचे पोस्टर, काय असेल कारण…