आतापर्यंत आयपीएलचे १३ हंगाम झाले आहेत आणि १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होईल. प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते की आयपीएलमध्ये आपल्याला संधी मिळावी आणि त्यात आपले कौशल्य दाखवून सर्वांची मने जिंकायची. नवीन खेळाडूंना अधिक चांगला खेळ दाखवून आयपीएलनंतर राष्ट्रीय संघात संधी मिळण्याची अपेक्षा असते. सध्या आयपीएलनंतर देशाच्या संघात खेळणार्या खेळाडूंची बरीच मोठी यादी आहे.
अनेक खेळाडू आयपीएलमध्ये शतक ठोकून आपली प्रतिभा दाखविण्याचा प्रयत्न करतात. आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूचा स्वत: चा असा चाहता वर्ग असतो. विराट कोहली, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी आणि ख्रिस गेल यांसारख्या फलंदाजांची फलंदाजी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. बर्याच वेळा खेळाडू त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे खेळ करतात तर कधी अपयशी ठरतात. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बर्याच खेळाडूंनी शतके ठोकली आहेत. मात्र, आज आपण अशा तीन खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात चार हजारांपेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. परंतु, यादरम्यान ते शतक साजरे करू शकले नाहीत.
एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीकडून प्रेक्षकांना षटकार-चौकारांची अपेक्षा असते. आतापर्यंत एमएस धोनीने आयपीएलच्या २०४ सामन्यांत ४६३२ धावा केल्या आहेत. २३ वेळा अर्धशतकीय डाव खेळणाऱ्या धोनीने अद्याप एकही शतक केले नाही. त्याची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या नाबाद ८४ आहे. बहुधा मधल्या फळीत फलंदाजीला आल्यामुळे त्याला शतक करता आले नसेल.
रॉबीन उथप्पा
रॉबिन उथप्पा कोलकाता नाईट रायडर्सकडून बरीच वर्षे खेळला. या फलंदाजाने आयपीएलमध्ये काही उकृष्ट खेळ्या खेळल्या आहेत. आयपीएलच्या सातव्या हंगामात ६६० धावा करणाऱ्या उथप्पाला त्या हंगामात ऑरेंज कॅप देखील मिळाली होती. यावर्षी तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. आतापर्यंत उथप्पाने १८९ सामन्यांत ४६०७ धावा केल्या आहेत. २४ अर्धशतक ठोकणार्या रॉबिन उथप्पाने वैयक्तिक सर्वाधिक ८७ धावा केल्या आहेत. अजूनपर्यंत त्याला आपल्या पहिल्या आयपीएल शतकाची वाट पाहावी लागत आहे.
गौतम गंभीर
कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार गौतम गंभीर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गंभीरने २०१८ मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेण्यापूर्वी ३६ अर्धशतकांसह १५४ सामन्यात ४२१७ धावा बनविल्या होत्या. आपल्या ११ वर्षाच्या आयपीएल कारकिर्दीत तो एकदाही शतक पूर्ण करू शकला नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या ९३ ही राहिली.