मुंबई। आज बांद्रा हॉटेलमध्ये टी २० मुंबई लीगचा लिलाव सुरु आहे. या लीग स्पर्धेत मुंबईचा एक ४६ वर्षीय खेळाडू देखील खेळणार आहे. या खेळाडूचे नाव प्रवीण तांबे असून तो टी २० मुंबई लीगमध्ये मुंबई नॉर्थ सेंट्रल संघाकडून खेळणार आहे.
त्याला आज मुंबई नॉर्थ संघाने ३,२०,००० रुपये देऊन संघात सामील करून घेतले आहे. या लीगसाठी त्याची मूळ किंमत १,५०,००० रुपये इतकी होती. त्याला त्याच्या या मूळ किमतीपेक्षा १,७०,००० रुपये जास्त मिळाले आहेत. तसेच तो ही लीग खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
तांबेला या आधी आयपीएलचा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून २०१३ मध्ये पदार्पण केले होते. त्याने या नंतर सनरायझर्स हैद्राबाद आणि गुजरात लायन्स या संघांचेही प्रतिनिधित्व केले.
त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ३३ सामने खेळले असून ३०.४६ च्या सरासरीने २८ बळी घेतले आहेत.
तसेच त्याने मुंबईकडून २ रणजी सामने खेळले आहेत. त्याचे रणजी स्पर्धेतील पदार्पणच डिसेंबर २०१३ मध्ये झाले आहे. त्यानंतर त्याने त्याचा दुसरा रणजी सामना २०१४ मध्ये खेळाला असून यानंतर त्याने रणजी सामने खेळले नाहीत.
आज दूपारी २ वाजता T20 मुंबई लीग लिलावाला सुरूवात झाली. हे लिलाव T20 Mumbai च्या फेसबुक पेजवर चाहत्यांसाठी लाईव्ह करण्यात आले आहेत.
ह्या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होणार असून यापुर्वीच संघ मालकांची नावे घोषीत करण्यात आली आहे.
ही लीग ११ मार्च ते २१ मार्च दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांच्या अंतराने आयपीएललाही सुरुवात होणार आहे.
काल या स्पर्धेतील संघमालकांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या स्पर्धेचा ब्रॅन्ड अॅंबेसिडर आहे.