पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत सतराव्या दिवशी दुसऱ्या लढतीत सचिन भोसले (४-९), रोहन खरात(३-१६) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत प्ले ऑफच्या शर्यतीत ४एस पुणेरी बाप्पा संघाचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. ४एस पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसले (४-९), रोहन खरात (३-१६), विवेक शेलार (३-३०) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे छत्रपती संभाजी किंग्स संघाचा डाव १८.४षटकात सर्वबाद ९१धावावर संपुष्टात आला. कर्णधार मुर्तझा ट्रंकवाला खाते न उघडताच तंबूत परतला. पुणेरी बाप्पाच्या विवेक शेलारने त्याला पायचीत बाद केले. ओम भोसले ने २३ धावा, ओमकार खाटपेने २१ धावा काढून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रोहन खरातने ओम भोसले व ओमकार खाटपेला बाद करून छत्रपती संभाजी किंग्स संघाला एकापाठोपाठ दोन धक्के दिले. त्यानंतर दिग्विजय पाटीलच्या १९ धावा वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
हे आव्हान ४एस पुणेरी बाप्पा संघाने १४.४षटकात २बाद १०२धावा करून पुर्ण केले. यात रामकृष्ण घोषने ३५चेंडूत १चौकार व २षटकारासह ३५धावांची संयमी खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर यश क्षीरसागरने २४चेंडूत नाबाद २९धावा, सुरज शिंदेने नाबाद १८ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
छत्रपती संभाजी किंग्स: १८.४षटकात सर्वबाद ९१धावा(ओम भोसले २३, ओमकार खाटपे २१, दिग्विजय पाटील १९, सचिन भोसले ४-९, रोहन खरात ३-१६, विवेक शेलार ३-३०) पराभुत वि.४एस पुणेरी बाप्पा: १४.४षटकात २बाद १०२धावा(रामकृष्ण घोष ३५(३५,१×४,२×६), यश क्षीरसागर नाबाद २९(२४,१×४,१×६), सुरज शिंदे नाबाद १८, श्रीपाद निंबाळकर १५, राजवर्धन हंगर्गेकर १-१८); सामनावीर – रोहन खरात