मुंबई। आज(29आॅक्टोबर) भारताने विंडीज विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडीयमवर पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात 224 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि अंबाती रायडूने शतकी खेळी केली. तर खलील अहमद आणि कुलदीप यादवने प्रत्येेेकी 3 विकेट्स घेतल्या.
भारताने विंडीज समोर विजयासाठी 50 षटकात 378 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतू विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. भूवनेश्वर कुमारने विंडीजचा सलामीवीर फलंदाज चंद्रपॉल हेमराजला पाचव्या षटकात 14 धावांवर असताना बाद केले.
याच षटकात शाय होपला कुलदीप यादवने अप्रतिम धावबाद केले. होपला भोपळाही फोडता आला नाही. त्याच्या पुढच्याच षटकात भारताचा कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर फलंदाज कायरन पॉवेलला थेट स्टंपवर चेंडू फेकत धावबाद केले.
त्यामुळे विंडीजचे पहिले तीन फलंदाज 6 षटकांच्या आत बाद झाल्याने या धक्यातून विंडीजचा संघ सावरु शकला नाही. त्यांच्या पुढच्या फलंदाजांनीही नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.
विंडीजकडून त्यांचा कर्णधार जेसन होल्डर सर्वाधिक 54 धावा करून नाबाद राहिला. मात्र बाकी फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यांच्याकडून होल्डर(54*), हेमराज(14), मार्लोन सॅम्यूएल्स(18), शिमरॉन हेटमेयर(13), फॅबिएन अॅलेन(10) आणि किमो पॉल(19) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.
भारताकडून खलील अहमद(3/13), कुलदीप यादव(3/42), भुवनेश्वर कुमार(1/30) आणि रविंद्र जडेजा(1/39) यांनी विकेट्स घेत विंडीजला 36.2 षटकात 154 धावांवर रोखले.
तत्पूर्वी भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली होती. या दोघांनी मिळून 71 धा.वांची सलामी भागीदारी रचली. पण ही भागीदारी तोडण्यात किमो पॉलला यश आले. त्याने 38 धावांवर खेळत असणाऱ्या शिखर धवनला बाद केले.
त्यानंतर काही वेळात कर्णधार विराट कोहलीही लवकर बाद झाला. पण कोहली(16) बाद झाल्यानंतर अंबाती रायडू आणि रोहित शर्माने तिसऱ्या विकेटसाठी 211 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी रंगत असतानाच अॅशले नर्सने रोहितला बाद केले.
रोहितने या सामन्यात 137 चेंडूत 162 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 20 चौकार आणि ४4 षटकार मारले. रोहित बाद झाल्यावर अंबाती रायडूही शतक पूर्ण केल्यावर लगेचच धावबाद झाला. त्याने 81 चेंडूत 100 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले.
त्याच्या पाठोपाठ एमएस धोनी 23 धावा करुन बाद झाला. त्याला केमार रोचने बाद केले. त्यानंतर मात्र विकेट न गमावत रविंद्र जडेजा(7*) आणि केदार जाधवने(16) भारताला 377 धावांचा टप्पा गाठून दिला.
विंडीजकडून केमार रोच(2/74) , अॅशले नर्स(1/57) आणि किमो पॉलने(1/88) विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा
–कोणत्याही संघाला न जमलेला पराक्रम भारतीय संघाने केला
–केवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम
–पुढच्या सामन्यातील ती चूक धोनीसाठी पडू शकते कारकिर्दीतील सर्वात महाग