भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं आपला संघ जाहीर केला आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे संपूर्ण मालिकेत भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. या बातमीद्वारे आपण अशा 5 खेळाडूंवर एक नजर टाकूया.
(5) ट्रॅव्हिस हेड – सलामीवीर ट्रॅव्हिस हेड गेल्या 1-2 वर्षांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विशेषत: भारताविरुद्ध त्याचे आकडे आणखी धोकादायक आहेत. हेडनं मायदेशात भारताविरुद्धच्या सहा कसोटी सामन्यांच्या 10 डावांत केवळ 299 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 42 होता. मात्र, गेल्या वर्षापासून ऑस्ट्रेलियातील कसोटीत त्याचा स्ट्राइक रेट 82 पर्यंत वाढला आहे.
(4) मार्नस लाबुशेन – मार्नस लाबुशेनची फलंदाजीची शैली अगदी वेगळी आहे. जर तो एकदा क्रीझवर सेट झाला, तर त्याला बाद करणं खूप कठीण होतं. लाबुशेन मोठ्या खेळी खेळण्यास सक्षम आहे. तो या ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा पाया आहे. त्यानं भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये पाच कसोटी सामन्यांच्या नऊ डावांत 51.55च्या सरासरीने 464 धावा केल्या आहेत.
(3) जोश हेझलवुड – वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आपल्या वेगानं भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. तो सातत्यानं एका टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो. मायदेशात त्यानं भारताविरुद्धच्या 11 कसोटींमध्ये 42 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सक्रिय गोलंदाजांमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला 36 धावांत ऑलआऊट करण्यात हेझलवुडनं महत्त्वाची भूमिका निभावली होती.
(2) स्टीव्ह स्मिथ – दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकतो. रिकी पाँटिंगनंतर तो भारताविरुद्ध मायदेशात सर्वाधिक कसोटी धावा करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. स्मिथनं मायदेशातील भारताविरुद्धच्या आठ कसोटी सामन्यांमध्ये 83.23 च्या सरासरीनं 1082 धावा केल्या आहेत. यात पाच शतकं आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.
(1) नॅथन लायन – ऑफस्पिनर नॅथन लायन भारतासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. लायन हा तो ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे, ज्यानं भारताविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं भारताविरुद्ध 15 कसोटी सामन्यांमध्ये 60 बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही गोलंदाजाला 50 बळीही घेता आलेले नाहीत. अलीकडच्या काळात भारतीय फलंदाजांना फिरकीपटूंविरुद्ध झालेला त्रास पाहता, लायन आणखी धोकादायक ठरू शकतो.
हेही वाचा –
रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह भारतीय संघाला मिळवून देणार यश? माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
चॅम्पियन्स ट्रॉफीचं प्रकरण न्यायालयात पोहोचलं! बीसीसीआयविरोधात कोर्टाचं दार ठोठावणार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड?
धोनीच्या संघातून खेळणार पंत? सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे मोठे वक्तव्य!