---Advertisement---

‘युनिवर्स बॉस’ गेलच्या नावावर आहेत आयपीएलचे ‘हे’ ५ मोठे विक्रम, ज्यांना मोडीत काढणे महाकठीण

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 6:48 PM
Chris-Gayle
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलचा मंगळवारी (२१ सप्टेंबर) ४२ वा वाढदिवस होता. या खेळाडूने आपल्या अद्भुत शैलीने आणि आपल्या झंझावाती फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय जेव्हा टी२० क्रिकेटचा प्रश्न येतो, तेव्हा या खेळाडूचा दर्जा आणखी उंचावतो. टी-२० क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावर असंख्य विक्रम नोंदवले गेले आहेत, जे इतर फलंदाजांना मोडणे सोपे काम नाही.

ख्रिस गेलने कोलकाता नाईट रायडर्सकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली, पण या खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळल्यानंतर लीगमध्ये खरी ओळख मिळाली. गेलने बेंगलोरकडून खेळताना दर्जेदार कामगिरी केली आहे. गेल सध्या आरसीबीचा भाग नसला, तरी तो पंजाब किंग्जकडून खेळत आहे.

आपण या लेखात, आयपीएलमध्ये ख्रिस गेलच्या ५ मोठ्या विक्रमांविषयी जाणून घेणार आहोत.

५. आयपीएलमध्ये ठोकले सर्वाधिक षटकार
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्यात ख्रिस गेल आघाडीवर आहे. गेलने या लीगमध्ये आपल्या सामर्थ्याचे जबरदस्त प्रदर्शन करत उत्तुंग षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये ३५० षटकार मारणारा ख्रिस गेल पहिला फलंदाज ठरला आहे. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये आतापर्यंत १४० सामन्यांमध्ये ३५७ षटकार आहेत. त्याच्याशिवाय इतर फलंदाजांना आयपीएलमध्ये २५० षटकारांचा टप्पाही गाठता आलेला नाही.

४. सलग दोन हंगामात मिळवली ऑरेंज कॅप
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणे सोपे काम नाही. एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ही टोपी दिली जाते आणि आतापर्यंत फक्त काही फलंदाजांनीच ऑरेंज कॅप जिंकली आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सलग दोन हंगामात हा पराक्रम केला होता. २०११ च्या लिलावात त्याच्यावर बोली न लागल्यावर, बदली खेळाडू म्हणून आणलेल्या गेलने त्या हंगामात १२ सामन्यांमध्ये ६७.५५ च्या सरासरीने ६०८ धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. यानंतर २०१२ साली गेल १५ सामन्यात ६१.०८ च्या जबरदस्त सरासरीने ७३३ धावा केल्याने सलग दुसऱ्यांदा या ऑरेंज कॅपचा विजेता ठरला होता.

३. आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक
सन २०१३ मध्ये, ख्रिस गेलने पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध आयपीएलच्या इतिहासाची एक अद्भुत खेळी खेळली होती. त्या खेळीदरम्यान गेलने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले होते. त्याचबरोबर गेलने आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला होता. गेलने केवळ ३० चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला होता. त्या सामन्यात त्याने १७५ धावांची खेळी केली होती

२. एका डावात सर्वाधिक षटकार
सन २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध खेळलेल्या त्याच्या झंझावाती खेळीत, गेलने विरोधी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. गेलने या डावात १७ षटकार ठोकले आणि आयपीएलमधील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला होता.

१. सर्वोच्च वैयक्तिक धावा
आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आयपीएल २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. गेलने या डावात ६६ चेंडूत १७ षटकार आणि १३ चौकार मारले होते. गेलच्या या खेळीमुळे आरसीबीने निर्धारित २० षटकांत २६३ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

निवृत्तीनंतरही वादात अडकला मार्लेन सॅम्युअल्स; आयसीसीने लावले गंभीर आरोप; होऊ शकते मोठी कारवाई

बापरे! तब्बल २२ क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफला मिळाला होता केवळ एक रुपया

एका सोशल मीडिया पोस्टमुळे पंजाबचा ‘हा’ खेळाडू आला गोत्यात; लवकरच होणार चौकशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---