जागतिक क्रिकेटमधील सर्वात रोमांचक टी20 स्पर्धा अर्थातच आयपीएलचा मेगा लिलाव सोमवारी पूर्ण झाला. सौदी अरेबियात झालेल्या या दोन दिवसीय लिलावात भारतासह परदेशातील अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. आता लिलाव संपल्यानंतर सर्वांच्या नजरा पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल हंगामाकडे लागल्या आहेत.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावामध्ये काही खेळाडूंवर खूप पैसा खर्च करण्यात आला, परंतु काही मोठे खेळाडू असे होते ज्यांना कोणताही खरेदीदार सापडला नाही. आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे अशा 5 मोठ्या खेळाडूंबद्दल सांगतो, जे आता पुढच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत.
(5) पियुष चावला (भारत) – भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज पियुष चावला हा एकेकाळी या लीगमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज होता. मात्र आता पियुष चावलाची आयपीएल कारकीर्द संपलेली दिसत आहे. या दिग्गज फिरकी गोलंदाजाला मेगा लिलावादरम्यान कोणत्याही संघानं विकत घेतलं नाही. आता तो पुढील वर्षी आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना दिसणार नाही. चावला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.
(4) डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खळबळ माजवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी फलंदाज मानल्या जाणाऱ्या या कांगारू खेळाडूवर लिलावादरम्यान कोणत्याही संघानं रस दाखवला नाही. वॉर्नरनं आयपीएलमध्ये दोन वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे.
(3) केन विल्यमसन (न्यूझीलंड) – न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन काही वर्षांपूर्वी आयपीएलचा आघाडीचा कर्णधार होता. त्यानं आयपीएल 2018 मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासह सनरायझर्स हैदराबादला फायनलमध्ये नेलं होतं. मात्र यावेळी या किवी खेळाडूवर कोणीही बोली लावली नाही.
(2) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथची आयपीएल कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. स्मिथला गेल्या वर्षीही कोणत्याही संघानं विकत घेतलं नव्हते. मात्र या मेगा लिलावात काही संघ त्याला घेऊ शकतात, असं वाटत होतं. मात्र या कांगारू खेळाडूला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही.
(1) शार्दुल ठाकूर (भारत) – भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. या कालावधीत तो विविध संघांसोबत खेळला. मात्र यावेळी शार्दुल ठाकूरला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. शार्दुलचं अनसोल्ड राहणं धक्कादायक आहे, कारण तो बरेच वर्ष भारतीय संघाचा नियमित सदस्य होता.
हेही वाचा –
अखेर अर्जुन तेंडुलकरवर बोली लागली! सुरुवातीला राहिला होता अनसोल्ड
काय होतास, काय झालास! मेगा लिलावात पृथ्वी शॉ अनसोल्ड, एकेकाळी सचिनशी व्हायची तुलना!
सीएसकेसाठी मैदान गाजवणारा अजिंक्य रहाणे ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार!






