ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 3-1 ने जिंकली आहे. रविवारी टीम इंडियानं मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 6 विकेटनं गमावली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं तिसऱ्या दिवशी फक्त 162 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं 27 षटकांत 4 गडी गमावून सामना सहज जिंकला. या कसोटीतील भारताच्या पराभवामागे 5 मोठी कारणे आहेत. चला तर मग, ती कारणे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
सलामीवीरांनी निराशा केली – सिडनीमध्ये भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सलामीवीर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल दोन्ही डावात भारताला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. यशस्वीनं 10 आणि 22 धावा केल्या. तर राहुल फक्त 4 आणि 13 धावांच करू शकला. भारताचा पहिला डाव 185 धावांवर तर दुसरा डाव 157 धावांवर आटोपला.
शुबमन गिल फ्लॉप – सिडनी कसोटीसाठी रोहितच्या जागी प्लेइंग 11 मध्ये आलेल्या शुबमन गिलला काही कमाल दाखवता आली नाही. त्यानं पहिल्या डावात 20 तर दुसऱ्या डावात केवळ 13 धावा केल्या. शुबमन तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरल्यानं मधल्या फळीवर तणाव लक्षणीयरित्या वाढला. गिलला या मालिकेत तीन कसोटी खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्यानं केवळ 93 धावा केल्या.
विराट कोहलीची सुमार कामगिरी – स्टार फलंदाज विराट कोहला सिडनीतही फ्लॉप झाला. त्यानं केवळ 17 आणि 6 धावा केल्या. या मालिकेत त्याची बॅट शांत राहिल्यामुळे ऑस्ट्रेलियाला वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली. पर्थमधील पहिल्या कसोटीत कोहलीनं शतक झळकावलं होतं, परंतु त्यानंतर त्याला सातत्य राखता आलं नाही. या मालिकेत विराटनं 23.75 च्या सरासरीनं केवळ 190 धावा केल्या.
रवींद्र जडेजा अपयशी – अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा सिडनीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला. तो चेंडू किंवा बॅटनंही विशेष छाप सोडू शकला नाही. त्यानं या सामन्यात एकही विकेट घेतली नाही. तो पहिल्या डावात 26 तर दुसऱ्या डावात 13 धावा करून बाद झाला. भारताला तिसऱ्या दिवशी जडेजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो केवळ 5 धावा जोडू शकला. तो बाद झाल्यानंतर भारताचा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
जसप्रीत बुमराहची उणीव भासली – तिसऱ्या दिवशी भारताला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची मोठी उणीव जाणवली. तो अनफिट असल्यामुळे गोलंदाजीसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं लक्ष्याचा सहज पाठलाग केला. पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर मैदानात उतरला नाही. दुसऱ्या दिवशी तो फलंदाजीला आला पण तो खातं उघडू शकला नाही. बुमराहनं या मालिकेत सर्वाधिक 32 विकेट घेतल्या. त्यानं पर्थ कसोटीत संघाचं नेतृत्व केलं, जी भारतानं 295 धावांनी जिंकली. रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह सिडनीमध्ये काळजीवाहू कर्णधार होता.
हेही वाचा –
भारताचे पानिपत! ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर जिंकली बॉर्डर-गावस्कर मालिका
तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी गुलाबी जर्सी का घातली? जाणून घ्या सिडनी ‘पिंक’ कसोटीचा इतिहास
विराटने मैदानावर केली ऑस्ट्रेलियन चाहत्यांची बोलती बंद, सँडपेपर घटना पुन्हा चर्चेत; VIDEO पाहा