भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट फिनिशर्समध्ये गणले जाते. तो परिस्थितीनुसार त्याच्या फलंदाजी शैलीचा योग्य वापर करत असतो. मग ते, कसोटीमध्ये सुरुवातीला हळूवार फलंदाजी करत टिकूण राहणे आणि शेवटच्या काही क्षणांना फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देणे असो किंवा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कमी चेंडूत अधिक धावा करत संघाच्या विजयात योगदान देणे असो. या सगळ्यात तो माहीर आहे.
पण, धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीत असे बऱ्याचदा झाले आहे की, तो त्याची लय सांभाळत शेवटपर्यंत सामन्यात टिकून राहिला. मात्र, चांगला शेवट करण्यात तो अपयशी ठरला. याचे मुख्य कारण म्हणजे, विरुद्ध संघातील गोलंदाज. तर जाणून घेऊया, धोनीला सामन्याच्या शेवटच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या काही गोलंदाजांविषयी.
भारत विरुद्ध इंग्लंड (बर्मिंघम, ३ सप्टेंबर २०१४) –
साल २०१४ला भारतीय संघाच्या इंग्लड दौऱ्यावर दोन्ही संघात केवळ एक टी२० सामना झाला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने २० षटकात ८ बाद १८० धावा केल्या होत्या. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीची १३१ धावांवर तिसरी विकेट पडली. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला, एमएस धोनी.
त्यावेळी धोनीने हळूवार धावा करण्यास सुरुवात केली. त्यावरून स्पष्ट दिसून येत होते की, धोनी शेवटपर्यंत सामन्यात टिकून राहणार आणि तसेच झाले. शेवटच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती पण भारताने केवळ १३ धावाच केल्या. धोनीने शेवटच्या षटकात १ षटकार, १ चौकार आणि पुढे पळत २ धावाही घेतल्या होत्या. पण, गोलंदाजी करणाऱ्या ख्रिस वोक्सने अफलातून गोलंदाजी केल्यामुळे भारताला ३ धावांनी पराभूत केले होते.
राइजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध सनराइजर्स हैद्राबाद (विशाखापट्टणम , १० मे २०१६) –
आयपीएलच्या ९व्या हंगामात १० मे २०१६ला राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि सनराइजर्स हैद्राबाद संघात आयपीएलचा ४० वा सामना झाला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने पुण्याला १३८ धावांचे आव्हान दिले होते.
पण, विरुद्ध संघात धोनी असल्यामुळे पुणे सहज जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण हैद्राबादच्या गोलंदाजांनी अशी काही गोलंदाजी केली की, ६व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला धोनी शेवटपर्यंत टिकूनही ३० धावाच करू शकला.
शेवटच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या आशिष नेहराने तिसऱ्या, ५व्या आणि ६व्या चेंडूवर अनुक्रमे थिसारा परेरा, धोनी आणि ऍडम झंपाला बाद केले होते. हैद्राबादने तो सामना ४ धावांनी जिंकला होता.
भारत विरुद्ध श्रीलंका (आयसीसी टी२० विश्वचषक अंतिम सामना, ढाका ६ एप्रिल २०१४) –
६ एप्रिल २०१४ला ढाका येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात आयसीसी टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारताने १९ षटकात ११९ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या.
त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी शेवटच्या षटकात धोनी मैदानावर उतरला होता. दुर्देवाने शेवटचे षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा टाकत होता. त्यातही धोनीने पहिल्या ५ चेंडूंवर स्वत:च फलंदाजी केली आणि केवळ ३ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे भारतीय संघाने श्रीलंकेला १३१ धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकाने १३ चेंडू राखून अगदी सहज १३४ धावा करत, ६ विकेट्सने चषक आपल्या नावावर केला होता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (चेन्नई, ११ सप्टेंबर २०१२) –
साल २०१२मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची टी२० मालिका झाला होती. यावेळी मालिकेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला १६८ धावांचे आव्हान दिले होते.
न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने ४१ चेंडूत ७० धावा केल्या होत्या. पुढे फलंदाजीस आलेल्या धोनीकडून उर्वरित प्रत्येक षटकात कमीत कमी ७ धावा घेण्याची अपेक्षा केली जात होती. पण, व्हिटोरी आणि फ्रँकलीनच्या गोलंदाजीवर धोनी ती गतीही राखु शकला नाही.
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. तेव्हा धोनीने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत युवराजला स्ट्राइकला पाठवले. पण, फ्रँकलीनने गोलंदाजी करत चौथ्या चेंडूवर त्याला त्रिफळाचीत केले. पुढे फलंदाजीस आलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त २ धावा घेऊ शकला आणि भारताने तो सामना १ धावेने गमावला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कानपूर, ११ ऑक्टोबर २०१५) –
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात २०१५ला पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यातील शेवटच्या षटकात धोनीने सर्वांना निराश केले होते. दक्षिण आफ्रिकाने दिलेल्या ३०४ धावांचे आव्हान भारताचे पूर्ण करायचे होते.
भारताने फलंदाजीची सुरुवात फटकेबाजीने केली होती. सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित शर्माने १५० धावा केल्या होत्या. तर, अजिंक्य रहाणेनेही ६० धावांचे योगदान दिले होते. रोहितची विकेट पडल्यानंतर संघाला २३ चेंडूत ३५ धावा करायच्या होत्या. त्यावेळी भारत ४ बाद २६९ धावांवर होता. तर, धोनी तेव्हापर्यंत १६ चेंडूत ९ धावांवर होता.
गोलंदाज इम्रान ताहिर, डेल स्टेन आणि कागिसो रबाडाने त्यावेळी चांगली गोलंदाजी केली होती. पण धोनी मात्र फटकेबाजी करण्याऐवजी १-१ धावा घेत होता. शेवटच्या षटकात भारताला १० धावा करायच्या होत्या. त्यावेळी रबाडा गोलंदाजी करत होता. त्याने षटकाच्या चौथ्या चेंडूवर धोनीला बाद केले आणि दक्षिण आफ्रिका संघाला ५ धावांनी तो सामना जिंकून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
प्रतिक्षा संपली! अखेर भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, वाचा कधी आणि कुठे होणार सामना
‘हा फोटो कधीचा…?’, असे विचारत सचिनने दिल्या दिग्गजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
‘फॉर्ममध्ये परतण्यासाठी आराम हा पर्याय नाही’, संघव्यवस्थापनावर भारतीय दिग्गज भडकला