२०१३ साली क्रिकेटजगतात एका नव्या टी२० क्रिकेट लीगने एंट्री केली. ही लीग म्हणजे वेस्ट इंडिजची सर्वात चर्चेत असणारी कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल). कोरोना व्हायरसदरम्यान यावर्षी सीपीएलचा आठवा हंगाम १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान खेळण्यात येणार आहे.
२० षटकांच्या या लीगमध्ये ड्वेन ब्रावो, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, ओशन थॉमस यांच्यासारखे अनेक स्टार खेळाडू मैदानावर त्यांची कमाल दाखवताना दिसतील. ही टी२० लीग असल्यामुळे फलंदाज ताबडतोब खेळी करत अधिकाधिक धावा करण्याचा प्रयत्न करतात. तर, गोलंदाज त्यांच्या शानदार गोलंदाजीने कमीतकमी धावा देत जास्तीत जास्त विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात असतात.
आजवर सीपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी नवनवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण, या लेखात सीपीएलमधील धाकड फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने चित करणाऱ्या दमदार गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. या गोलंदाजांनी सीपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स चटकावल्या आहेत.
सीपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज (Top-5 Bowlers Who Take Most Wickets In CPL) –
१. ड्वेन ब्रावो – ९७ विकेट्स
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने सीपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. २०१३पासून ते २०१८ पर्यंत ब्रावोने ६९ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २१.५२ सरासरीने ९७ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या २३ धावा देत ५ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे.
ब्रावोच्या गोलंदाजीची विशेषता म्हणजे त्याची हळूवार चेंडू टाकण्याची शैली होय. त्याला एक चांगला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हटले जाते. सीपीएलमध्ये ब्रावोचा इकोनॉमी रेट ८.७२ इतका आहे. सीपीएलच्या आठव्या हंगामात ब्रावोला एक नवा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तो सीपीएल इतिहासात १०० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनू शकतो. यासाठी त्याला फक्त ३ विकेट्सची आवश्यकता आहे.
ब्रावो या हंगामात ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसेल. या संघाव्यतिरिक्त तो सीपीएलमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो रेड स्टील संघाकडून खेळला आहे.
२. कृषमर संतोकी – ८५ विकेट्स
सीपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या युवा गोलंदाज कृषमर संतोकीचे नाव सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर येते. संतोकीला टी२० स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळखले जाते. संतोकीने त्याच्या वेगवान गोलंदाजीने अनेक फलंदाजांना चित केले आहे.
संतोकीने सीपीएलमध्ये आतापर्यंत ५८ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १९.९०च्या सरासरीने आणि ७.५९च्या इकोनॉमी रेटने ८५ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या सीपीएलमधील ११ धावा देत ४ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाचा समावेश आहे. २०१३पासून ते २०१९पर्यंत संतोकी गयाना अमेझॉन वॉरियर्स, जमैका तलाव्हाज, सेंट किट्स आणि नैविस पैट्रियट्स, सेंट लूसिया जोर्क या संघांकडून खेळला आहे.
३. रायड एमरिट – ८५ विकेट्स
सेंट किट्स आणि नैविस पैट्रियट्स संघाचा मध्यमगती गोलंदाज रायड एमरिट हा सीपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याने सीपीएलमध्ये ७५ सामन्यात ८५ विकेट्स घेतल्या आहेत. एमरिटची विशेषता म्हणजे, नव्या चेंडूसह पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणे.
एमरिटची सीपीएलमधील गोलंदाजी सरासरी ही २३.४४ इतकी आहे. तर, त्याचा इकोनॉमी रेट हा ७.८५ इतका आहे. एमरिट सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रिडेंट, गयाना अमोझॉन वॉरियर्स, सेंट किट्स आणि नैविस पेट्रियट संघांकडून खेळला आहे.