आजकालच्या फलंदाजीमध्ये बरेच बदल झाले आहेत. प्रत्येक चेंडूवर धावा मिळवण्यासाठी फलंदाज प्रयत्न करीत असतो. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला धावा रोखणे अवघड होते आणि त्याला धावा रोखणारा गोलंदाज शोधावा लागतो. अशा वेळी गोलंदाजांना निर्धाव षटक (Maiden Over) टाकणे खूप कठीण झाले आहे. कसोटीमध्ये गोलंदाज निर्धाव षटक सहजपणे टाकतो, परंतु मर्यादित षटकांत निर्धाव षटक करणे तितकेसे सोपे नाही.
निर्धाव षटक किंव्हा सतत निर्धाव चेंडू टाकल्याने फलंदाजांवर दडपण येतो अशावेळी फलंदाज त्याची विकेट गमावण्याची जास्त संधी असते. म्हणून, सतत निर्धाव चेंडू टाकून धावा रोखणे आणि फलंदाज बाद करून संघाला यश मिळवून ही गोलंदाजीची जबाबदारी असते.
कसोटी क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या नावावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज शॉन पोलॉक (Shaun Pollock) याने वनडेत सर्वाधिक निर्धाव षटके टाकली आहेत.
परंतु आपणास माहिती आहे का आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही प्रकारात म्हणजेच कसोटी, वनडे आणि टी२० मध्ये सर्वाधिक निर्धाव षटके कोणी टाकली आहेत? चला नजर टाकूया त्या ५ गोलंदाजांवर ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज –
५. शॉन पोलॉक (Shaun Pollock) – दक्षिण अफ्रीका – १५३६ निर्धाव षटके
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज शॉन पोलॉक हा सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक मानला जातो. जर फलंदाजीचादेखील विचार केला तर पोलॉक हा आफ्रिकन संघातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या माजी कर्णधाराने आपल्या संघासाठी १०८ कसोटी, ३०३ वनडे आणि १२ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४२१, वनडे सामन्यात ३९३ आणि टी-२० मध्ये १५ विकेट्स घेतले आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३१३ निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम पोलॅकच्या नावावर आहे आणि ही एक मोठी कामगिरी आहे. कसोटीत त्याने एकूण १२२२ निर्धाव षटके नोंदविली आहेत आणि त्या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० सामने जास्त खेळला नाही पण १२ सामन्यांत तो केवळ एक निर्धाव षटक टाकू शकला.
अशाप्रकारे त्याने ४२३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५३६ निर्धाव षटके टाकली आहेत आणि सर्वाधिक निर्धाव षटके गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो पाचव्या स्थानावर आहे.
४. अनिल कुंबळे (Anil Kumble) – भारत – १६८५ निर्धाव षटके
अनिल कुंबळे हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एक महान लेगस्पिनर आहे. त्याचे भारतीय क्रिकेटमध्ये योगदान उल्लेखनीय आहे. भारताकडून त्याने कसोटी आणि वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत, परंतु त्याने कधीही भारतीय संघासाठी टी२० सामना खेळला नाही.
कुंबळेने भारताकडून १३२ कसोटी सामन्यांत ६१९ विकेट्स घेतल्या असून २७१ वनडे सामन्यात ३३७ विकेट्स घेतल्या आहेत, यामध्ये भारताकडून ३३४ विकेट्स आणि आशिया इलेव्हनसाठी ३ विकेट्स घेतल्या आहेत.
कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये १५७६ निर्धाव षटके फेकली असून या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. पण वनडे सामन्यात त्याने फक्त १०९ निर्धाव षटके टाकले आहेत. एकूण ४०३ आंतरराष्ट्रीय सामन्यात कुंबळेने १६८५ निर्धाव षटके टाकली आणि सर्वाधिक निर्धाव षटके गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.
३. ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) – ऑस्ट्रेलिया – १७४९ निर्धाव षटके
ग्लेन मॅकग्रा नक्कीच ऑस्ट्रेलियाचा सर्वात वेगवान महान गोलंदाज आहे. त्याचे रेकॉर्डस् त्याची महानता दाखवून देतात. मॅकग्राने बराच काळ ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाची, वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. याच कारणास्तव तो क्रिकेट इतिहासातील एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो.
मॅकग्राने ऑस्ट्रेलियासाठी १२४ कसोटी, २५० वनडे आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. क्वचितच त्याच्या सारखा विक्रम कोणत्या वेगवान गोलंदाजांचा असेल. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५६३ बळी घेतले आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे.
वनडे सामन्यात मॅकग्राने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ३८१ बळी घेतले आहेत. जगातील सर्वाधिक वनडे विकेट घेणाऱ्यांमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून त्याने दोन टी-20 सामन्यात ५ बळी घेतले आहेत.
मॅकग्रा अचूक टप्प्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. वनडे सामन्यात शॉन पोलॉकनंतर त्याने २७९ निर्धाव षटके फेकली आहेत. कसोटीत त्याच्या नावावर १४७० निर्धाव षटके आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. टी-२० मध्ये त्याला एकही निर्धाव षटक टाकता आले नाही.
एकूण ३७६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने १७४९ निर्धाव षटके फेकली आहेत आणि सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो तिसर्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
२. शेन वॉर्न (Shane Warne) – ऑस्ट्रेलिया – १८७१ निर्धाव षटके
१९९३ मध्ये इंग्लंडच्या माईक गेटिंगला “बॉल ऑफ़ द सेंचुरी” टाकणारा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने बरीच वर्षे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची सेवा केली. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या यशामध्ये त्यांचे योगदान अफाट आहे हे त्याच्या रेकॉर्ड दिसते.
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी सामन्यांमध्ये विक्रमी ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. जगातील सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून १९४ वनडे सामने खेळले असून त्यात २९३ बळी घेतले आहेत. ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली (Brett Lee) यांच्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडून तिसर्या क्रमांकाचा सर्वाधिक वनडे विकेट्स घेणारा खेळाडू आहे. वॉर्न ऑस्ट्रेलियाकडून एकही टी-२० सामना खेळला नाही.
शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये १७६१ निर्धाव षटके टाकली आणि तो या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. वनडे सामन्यात ११० निर्धाव षटके आहेत. एकूणच त्याने ३३९ आंतरराष्ट्रीय सामन्यात १८७१ निर्धाव षटके फेकली आहेत आणि सर्वाधिक निर्धाव षटके गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसर्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
१. मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) – श्रीलंका – १९९२ निर्धाव षटके
कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्या श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनला फिरकी गोलंदाजीचा “जादूगार” म्हणतात. श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरलीधरनला २००२ मध्ये क्रिकेट चा बायबल सॅमला जाणाऱ्या “विज्डन क्रिकेटर्स अल्मनाक” (Wisden Cricketers Almanack) मध्ये कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडले होते.
कसोटी आणि वनडे या दोन्ही प्रकारात त्याचे विक्रम जबरदस्त आहे. त्याने १३३ कसोटी सामने खेळून ८०० विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये ७९५ श्रीलंकेसाठी आणि ५ विकेट्स आयसीसी वर्ल्ड इलेव्हनसाठी घेतल्या. तसेच ३५० वनडे सामन्यात ५३४ विकेट्स घेतल्या. ज्यात श्रीलंकेकडून ५२३ बळी, आयसीसी वर्ल्ड इलेव्हनकडून ५ विकेट आणि आशिया इलेव्हनसाठी खेळताना ६ विकेट्सचा समावेश आहे. मुरलीधरनने १२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत आणि त्यामध्ये १३ बळी घेतले आहेत.
मुरलीधरनने कसोटी सामन्यात सर्वात जास्त म्हणजे १७९४ निर्धाव षटके टाकली आहेत. तसेच १९८ वनडेत निर्धाव षटके टाकली आहेत. टी-20 मध्ये त्याला एकही निर्धाव षटक टाकता आले नाही.
एकूणच त्याने ४९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १९९२ निर्धाव षटके फेकली आहेत आणि सर्वाधिक निर्धाव षटके गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये प्रथम क्रमानं मिळवला.
वाचनीय लेख –
आयपीएलमधील धोनीचे कारनामे रोहित काय जगातील कुणालाच मोडणे केवळ अशक्य
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा