आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांमध्ये सलामीचा सामना खेळवला जाईल. या हंगामासाठीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
आयपीएल मध्ये कायमच चाहत्यांना चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळते. त्याचवेळी काही असे वाद देखील समोर येतात ज्याने चाहते चक्रावून जातात. विशेषतः पंचांच्या निर्णयांमुळे झालेले वाद विशेष चर्चेत येतात. या लेखात आपण आयपीएल इतिहासातील अशाच काही वादग्रस्त निर्णयांमुळे बाद दिल्या गेलेल्या फलंदाजांबद्दल चर्चा करणार आहोत.
१) डेव्हिड वॉर्नरला दिले झेलबाद –
आयपीएल २०२०च्या हंगामात एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाविरुद्ध सनरायझर्स हैद्राबादच्या डेव्हिड वॉर्नरला कॅच विकेटकीपरने घेतला होता. मैदानावरच्या अंपायरनी त्याला नाबाद दिले होते. मात्र बंगलोरने रिव्ह्यू घेतल्यावर वॉर्नरला बाद दिले. खरंतर टीव्ही रिप्ले मध्ये चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसत नव्हते. मात्र तरीही त्याला बाद दिल्याने हा निर्णय वादग्रस्त ठरला होता.
२) अश्विनने जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद –
अश्विनने जोस बटलरला आयपीएल २०१९ मध्ये मंकडिंग पद्धतीने बाद केले होते. हा बहुतेक सगळ्यात विवादास्पद पद्धतीने बाद देण्यात आलेला निर्णय होता. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आर अश्विनने राजस्थानच्या जोस बटलरला चेंडू टाकण्यापूर्वीच तो क्रीजमधून बाहेर निघाल्याने धावबाद केले होते. बटलरने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती, मात्र नियमात बसत असल्याने अंपायरनी त्याला बाद दिले होते.
३) युसूफ पठाणला ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्ड मुळे दिले बाद –
आयपीएल २०१३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या युसूफ पठाणला ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्ड मुळे बाद देण्यात आले होते. पुणे वॉरियर्स विरूद्धच्या सामन्यात १८व्या षटकात युसूफने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र धाव घेण्याच्या नादात त्याचा पाय चेंडूला लागला. पण ही कृती ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्ड असल्याचे ठरवून त्याला बाद देण्यात आले.
४) धोनीचा आयपीएल फायनलमधील रन आउट –
आयपीएल २०१९च्या फायनलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचा रन आउट चांगलाच वादात सापडला होता. एका ओव्हर थ्रोवर धाव घेण्याचा धोनी प्रयत्न करत होता. मात्र त्यावेळी हार्दिक पंड्याचा थ्रो त्यावेळी थेट स्टंपवर लागला. टीव्ही रिप्ले स्पष्ट काही दिसत नव्हते, मात्र तरीही तिसर्या पंचांनी त्याला बाद दिले होते.
५) अमित मिश्रा ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्ड मुळे बाद –
अमित मिश्रा हा ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्ड मुळे बाद देण्यात आलेला आयपीएल मधील दुसरा खेळाडू ठरला. आयपीएल २०१९ मध्ये सनरायझर्स हैद्राबादविरूद्ध दिल्लीला ३ चेंडूंवर २ धावा हव्या होत्या. यावेळी मिश्राने फटका मारतांना हुकवला आणि चेंडू विकेटकीपरच्या हाती गेला. यावेळी मिश्रा धाव घेण्यासाठी पळाला, मात्र विकेटकीपरने नॉन-स्ट्राईकला मारलेला चेंडूच्या मध्ये मिश्रा आला. यावर हैद्राबादने ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्डचे अपील केले. जे मान्य करून मिश्राला बाद देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
आगामी आयपीएलमध्ये हे तीन मुंबईकर उडवू शकतात भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा बनवणारे फलंदाज
असे खूप भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना विदेशी फ्रँचायझी टी२० लीगमध्ये खेळायचे आहे, या दिग्गजाचा दावा






