खेळ कोणताही असो प्रत्येक खेळाडूची आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी व्हावी अशी इच्छा असते. क्रिकेटपटूही याला अपवाद नाहीत. आपल्या पदार्पणाचा सामना आपल्या कामगिरीमुळे सर्वांना लक्षात रहावा असे अनेक क्रिकेटपटूंना वाटते. प्रत्येक क्रिकेटपटूसाठी पदार्पणाच्या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. अनेकजण पदार्पणात सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वीही ठरतात. एवढेच नाही तर असेही काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात शानदार कामगिरीने केवळ सर्वांना प्रभावितच केले नाही, तर सामानावीराचाही पुरस्कार मिळवला.
आत्तापर्यंत १५ फलंदाजांनी वनडेमध्ये पदार्पण करताना शतकी खेळी केली आहे आणि आपला पहिला वनडे सामना यादगार बनवला आहे. काही क्रिकेटपटू पदार्पणात अपयशीही ठरले. तर काही असेही क्रिकेटपटू आहेत, ज्यांना पदार्पणाच्या वनडे सामन्यात शतक करण्याची संधी होती, परंतु ती संधी त्यांच्याकडून अगदी थोडक्यात हुकली.
आत्तापर्यंतच्या जवळपास ५० वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात असे ५ फलंदाज आहेत, जे पदार्पणाच्या वनडे सामन्यात नर्वस नाइंटिजचे शिकार झाले. यातील ४ फलंदाज नर्वस नाइंटिजमध्ये बाद झाले तर एक फलंदाज नर्वस नाइंटिजमध्ये असताना नाबाद राहिला. नर्वस नाइंटिजमध्ये बाद म्हणजेच फलंदाज जेव्हा ९० ते ९९ या दरम्यानच्या धावसंख्येवर बाद होतो. या लेखात त्या ५ फलंदाजांबद्दल जाणून घेतले आहे, जे वनडे पदार्पणात नर्वस नाइंटिजचे शिकार झाले.
५. स्टिफन फ्लेमिंग – ९० धावा, विरुद्ध भारत, १९९४
न्यूझीलंडचे माजी दिग्गज कर्णधार स्टिफन फ्लेमिंग यांनी २५ मार्च १९९४ ला भारताविरुद्ध नेपियर येथे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २४० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून फ्लेमिंग यांनी ९० धावांची सर्वोच्च खेळी केली होती. पण त्यांचे शतक केवळ १० धावांनी हुकले. ते १०७ चेंडूत ९० धावांवर धावबाद झाले. त्यावेळी ते वनडे पदार्पणात नर्वस नाइंटिजमध्ये बाद होणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्या सामन्यात भारताला २१२ धावाच करता आल्याने २८ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
४. रस्सी वॅन दर दुसेन – ९३ धावा विरुद्ध पाकिस्तान, २०१९
दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज रस्सी वॅन दर दुसेनने १९ जानेवारी २०१९ ला पोर्ट एलिझाबेथ येथे पाकिस्तान विरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून रस्सी वॅन दर दुसेनने १०१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ९३ धावांची खेळी केली. परंतू त्याचे शतक थोडक्यात हुकले. तो डावाच्या ४७ व्या षटकात हसन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल शोएब मलिकने घेतला. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २ बाद २६६ धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानला २६७ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पाकिस्तानने ५ चेंडू राखत ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळवला होता.
३. फिल जॅक्स – ९४ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००६
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज फिज जॅक्सने २० जानेवारी २००६ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे वनडे पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून डावात सर्वोच्च ९४ धावांची खेळी केली. त्याने ही खेळी ११२ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने केली होती. तो जोहान व्हॅन डर वॅथच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २४५ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल २४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ १८६ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ५९ धावांनी विजय मिळवला होता.
२. ओएन मॉर्गन – ९९ धावा विरुद्ध स्कॉटलंड, २००६
ओएन मॉर्गनला सर्वजण इंग्लंडचा सध्याचा कर्णधार म्हणून ओळखतात. त्याने इंग्लंडकडून खेळताना मोठे यशही मिळवले. पण मॉर्गनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण आयर्लंड संघाकडून झाले होते. त्याने ५ ऑगस्ट २००६ ला आयर्लंडकडून स्कॉटलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
त्या सामन्यात त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडकडून १३४ चेंडूत ९९ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला होता. आयर्लंडच्या डावातील ही सर्वोच्च खेळी होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर आयर्लंडने ८ बाद २४० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १५५ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात मॉर्गनलाच सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
१. स्वप्निल पाटिल – नाबाद ९९ धावा विरुद्ध स्कॉटलंड, २०१४
संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) यष्टीरक्षक फलंदाज स्वप्निल पाटिलने १ फेब्रुवारी २०१४ ला स्कॉटलंड विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २८५ धावा करत युएईला २८६ धावांचे विजयासाठी आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युएईकडून स्वप्निल पाटिलने शानदार नाबाद ९९ धावांची खेळी केली. पण तो युएईला विजय मिळवून देऊ शकला नाही. युएईला ५० षटकात ९ बाद २४४ धावाच करता आल्या. यावेळी स्वप्निल ९९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार मारत ९९ धावांवर नाबाद राहिला. त्याला सामन्याच्या शेवटच्या चेंडूत एकच धाव घेता आल्याने शतक पूर्ण करता आले नाही. कारण त्याला शतकासाठी शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती.
वाचनीय लेख –
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
कसोटीत सर्वात जलद द्विशतक करणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज
आयपीएलमार्गे देशाकडून कमबॅकची स्वप्नं पाहणारे ४ क्रिकेटर, २ आहेत भारतीय