तुम्हा सर्वांना युवराज सिंगबाबत माहिती असेलच, ज्यानं 2011 मध्ये कॅन्सर झाला असताना भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता. विश्वचषकानंतर युवराजनं कॅन्सरवर इलाज केला आणि भारतीय संघात पुनरागमन देखील केलं. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, कॅन्सरवर मात करणारा युवराज हा एकमेव क्रिकेटपटू नाही! या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला युवराजसह अशा 5 क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी कॅन्सरवर मात केली.
(1) युवराज सिंग – भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं 2011 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. परंतु स्पर्धेदरम्यान तो अज्ञात आजाराशी झुंज देत होता. विश्वचषक संपल्यानंतर त्याला कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यानंतर 2012 मध्ये तो उपचारासाठी अमेरिकेला गेला. तेथे यशस्वी उपचारानंतर युवराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. तो 2014 मध्ये भारतासाठी टी20 विश्वचषक स्पर्धेतही खेळला.
(2) योगराज सिंग – मुलगा युवराज सिंग कर्करोगातून बरा झाल्यानंतर त्याचे वडील आणि माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंग हे 2014 मध्ये कर्करोगाचे बळी ठरले. वास्तविक, योगराज सिंग यांना घशाचा कर्करोग झाला होता. त्यांनीही अमेरिकेत उपचार केले. कॅन्सरवर मात केल्यानंतर योगराज यांनी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यांच्या क्रिकेट अकादमीमध्ये कोचिंगही सुरू केलं.
(3) मॅथ्यू वेड – ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड क्रिकेटमध्ये येण्यापूर्वीच कर्करोगानं ग्रस्त होता. वास्तविक, वेडला वयाच्या 16व्या वर्षी पाठीला दुखापत झाली होती. त्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेला आणि नंतर त्याला टेस्टिक्युलर कॅन्सर झाल्याचं कळलं. यानंतर वेडनं उपचार घेतले आणि 2011 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलं.
(4) डेव्ह कॅलाघन – दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू डेव्ह कॅलाघनला 1991 मध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरचं निदान झालं होतं. यामुळे त्याला 1992 च्या विश्वचषकातून बाहेर व्हावं लागलं. कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर कॅलाघननं एका वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं.
(5) ॲशले नॉफके – ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ॲशले नॉफके ह्याला हिप एंजरी झाली होती. उपचारादरम्यान त्याला त्वचेचा कर्करोग झाल्याचं उघडीस आलं. त्यानंतर नॉफकेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही काळानं तो बरा झाला. कर्करोगातून बरा झाल्यानंतर तो मैदानात परतला, परंतु तो ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करू शकला नाही. यानंतर त्यानं निवृत्ती घेतली.
हेही वाचा –
आधी मार खाल्ला, मग वचपा काढला; दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान रियान आणि अर्शदीपमध्ये खडाजंगी
INDvsBAN : कानपूरमध्ये कसोटी आयोजित करण्यावरुन बीसीसीआयला धमकी, बदलणार दुसऱ्या सामन्याचे ठिकाण?
ऑस्ट्रेलियाच्या ओपनरचा टीम इंडियाला इशारा, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत मोठं वक्तव्य