अनेक खेळाडूंचे स्वप्न असते की त्यांना भारतीय संघाकडून खेळायला मिळावे. तर बरेचशे खेळाडू जे वनडे किंवा टी२० संघातून भारताचे प्रतिनिधित्त्व करतात त्यांचे स्वप्न असते की त्यांनी एकदा तरी कसोटी क्रिकेट खेळावे. तर, असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमधून भारतीय संघात पदार्पण केले. त्यानंतर त्यांना वनडे संघात स्थान मिळाले.
वेळेनुसार भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन करत क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. वर्तमान काळातही भारतीय कसोटी संघातील अनेक खेळाडू क्रिकेटविश्वात आपल्या कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी राहिले आहेत. परंतु, भारतातील असेही काही सक्रिय खेळाडू आहेत, जे फक्त एक कसोटी सामना खेळू शकले. तर, असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये सलग उत्कृष्ट प्रदर्शन केले. पण, त्यांना भारतीय कसोटी संघातून खेळण्याची संधी मिळाली नाही.
या लेखात अशाच ५ सक्रिय भारतीय खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांना भारतीय संघाकडून फक्त एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. (5 Current Indian Players Who Played Only one Test Match) –
विनय कुमार –
या गोलंदाजाने भारताकडून फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. जानेवारी २०१२मध्ये पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून विनय कुमारने कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पहिल्या सामन्यातच विनयने मायकल हसीची विकेट घेतली होती. परंतु, ऑस्ट्रेलियाने तो सामना एक डाव आणि ३७ धावांनी खिशात घातला होता. त्या सामन्यानंतर विनयला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही. असे असले तरी, त्याने भारताकडून ३१ वनडे आणि ९ टी२० सामने खेळले आहेत.
नमन ओझा –
नमन ओझा या यष्टीरक्षक फलंदाजाने एमएस धोनीच्या काळात दमदार कामगिरी केली होती. पण, त्याला भारताकडून फक्त एक कसोटी सामना खेळायला मिळाला. २०१५ला कोलंबो येथे श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यातून ओझाने कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात ओझाने २१ आणि दुसऱ्या डावात ३५ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही.
कर्ण शर्मा –
भारताचा फिरकीपटू गोलंदाज कर्ण शर्मा हा देखील असा क्रिकेटपटू आहे, ज्याला भारताकडून फक्त एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. डिसेंबर २०१४ला ऍडलेड येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून शर्माने कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शर्माने ४ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु, त्यावेळी भारतीय कसोटी संघात आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि कुलदिप यादव असे गोलंदाज असल्यामुळे एवढ्या दमदार प्रदर्शनानंतरही त्याला संघातून बाहेर करण्यात आले. त्यामुळे तो सामना शर्माचा पहिला आणि शेवटचा कसोटी सामना ठरला.
शाहबाज नदीम –
शाहबाज नदीम या फिरकीपटू गोलंदाजाला अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघात प्रवेश मिळाला. २००४मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या नदीमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी २०१९पर्यंत वाट पाहावी लागली. अखेर ऑक्टोबर २०१९ला रांची येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून नदीमने कसोटीत पदार्पण केले. यावेळी सामन्यातील दोन्ही डावात नदीमने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. असे असले तरी, त्याला पुढे भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही. विशेष म्हणजे, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४४३ विकेट्स घेतल्या आहेत.
जयदेव उनाडकट –
जयदेव उनाडकटने वयाच्या १९व्या वर्षी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सेंचुरियन येथे आपले कसोटी पदार्पण केले. डिसेंबर २०१०मधील त्या सामन्यात झहीर खानला दुखापत झाल्यामुळे उनाडकटला संधी मिळाली होती. परंतु, दुर्दैवाने भारताने तो कसोटी सामना एक डाव आणि २५ धावांनी गमावला होता. उनाडकटलाही त्या सामन्यात चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्यानंतर त्याला पुन्हा भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही.
ट्रेंडिंग लेख –
गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….
६ युवा खेळाडू जे यावर्षी २०२० आयपीएलमध्ये करू शकतात पदार्पण…
रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेट ली म्हणतो, हा भारतीय क्रिकेटर म्हणजे तर साक्षात रिकी पॉटींगच
खुशखबर! क्रिकेटमधील धमाल लीग असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर
कोरोनामुळे ४ महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये अडकलेला क्रिकेटर अखेर वेस्ट इंडिजला रवाना