नवी दिल्ली – जगात असे अनेक दिग्गज गोलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत अनेक बळी आपल्या खात्यात जमा केले आहेत. परंतु त्यांच्या कारकिर्दीत ते एका एकदिवसीय सामन्यात पाच बळी घेण्यात यशस्वी ठरलेले नाहीत.
खरे तर एकदिवसीय सामन्यात एखाद्या गोलंदाजाच्या वाट्याला जास्तीत जास्त 10 षटके म्हणजे एकूण 60 चेंडू येतात. अशावेळी एखाद्या सामन्यात पाच विकेट घेत समोरच्या संघातील निम्मे खेळाडू तंबूत धाडणे, हा विक्रम प्रत्येक गोलंदाजाला खुणावत असतो. परंतु प्रत्येकाला तो साध्य होतोच असे नाही.
या लेखात आपण जगातील असे 5 खेळाडू पाहणार आहोत. ज्यांचे नाव क्रिकेट जगतात दिग्गज गोलंदाज म्हणून घेतले जाते. परंतु, या पाचही खेळाडूंना अद्याप एका एकदिवसीय सामन्यात पाच बळी घेता आलेले नाहीत. विशेष म्हणजे या यादीत दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.
- जेम्स फॉकनर – ऑस्ट्रेलिया
जेम्स फॉकनर हा ऑस्ट्रेलिया संघातील एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. फलंदाजी, क्षेत्ररक्षण या प्रमाणेच गोलंदाज म्हणूनही फॉकनरने आपला ठसा उमटवला आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूला अद्याप एका वनडे सामन्यात पाच बळी टिपता आलेले नाहीत.
जेम्स फॉकनरने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाकडून 69 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 96 विकेट आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फॉकनर हा संघासाठी गरज असेल तेव्हा एक गोलंदाज म्हणूनही चोख कामगिरी बजावत असतो. त्याने वेस्ट इंडीज विरुद्धच्या एका सामन्यात 32 धावा देऊन 4 बळी घेणे, ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सध्या फॉकनर हा मागील अनेक दिवसांपासून संघाबाहेर असल्याचे दिसत आहे.
- मोहम्मद नबी – अफगाणिस्तान
अफगाणिस्तान संघाचा पुर्व कर्णधार आणि जगातील एक दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून मोहम्मद नबीचे नाव घेतले जाते. मोहम्मद नबीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 121 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 32.15 च्या सरासरीने तब्बल 128 विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद नबीने घेतलेल्या 128 विकेटमध्ये 30 धावांच्या बदल्यात 4 बळी, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. मात्र, अफगाणिस्तानचा हा दिग्गज खेळाडू एका सामन्यात पाच बळी घेण्यात अयशस्वी राहिला आहे.
- इशांत शर्मा – भारत
भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज म्हणून इशांत शर्मा आजही संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. आजपर्यंत इशांतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत तब्बल 115 बळी आपल्या खात्यात जमा केले आहेत.
इशांत शर्माने 2007 साली वनडेमध्ये पदार्पण केले होते. इशांतचा तो सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होता. तसेच सध्या इशांत कसोटी सामने आणि आयपीएलचे सामने देखील खेळत आहे. इशांत शर्माने श्रीलंकेविरुद्ध खेळत असताना आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. त्या सामन्यात इशांतने अवघ्या 34 धावांमध्ये लंकेच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडले होते. मात्र, या एक्सप्रेस गोलंदाजाला अद्यापही एका एकदिवसीय सामन्यात पाच विकेट घेण्याची कामगिरी करता आली नाही.
इशांतचे हे यश जरी त्याला हुलकावणी देत असले, तरी तब्बल सहावेळा समोरच्या संघातील ४ खेळाडूंना एकाच सामन्यात बाद करण्याची किमया इशांतने साध्य केलेली आहे. त्यामुळे अजूनही मैदानावर धावत असलेला इशांत एखाद्या वनडे सामन्यात संधी मिळाली तर पाच विकेट घेण्याचीही कामगिरी करु शकतो.
- शेन वॉटसन – ऑस्ट्रेलया
एक गुणवान खेळाडू म्हणून शेन वॉटसनची ओळख आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू असणारा वॉटसन हा संघासाठी अनेकदा गोलंदाज म्हणून देखील मदतीला धावला आहे. संघाच्या वाटचालीत एक फलंदाजाप्रमाणे त्याने उत्तम गोलंदाज म्हणूनही कामगिरी केलेली आहे.
शेन वॉटसनने 2002 साली दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आपले पदार्पण केले होते. वॉटसनकडे क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक ती गुणवत्ता आणि विविधता भरपूर प्रमाणात आहे. एक गोलंदाज म्हणून त्याने पाकिस्तानच्या संघाविरुद्ध आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्यात वॉटसनने 36 धावा देत 4 खेळाडूंना बाद केले होते.
ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज खेळाडूला मात्र एका एकदिवसीय सामन्यात पाच विकेट घेण्याची किमया काही साधता आली नाही. तसेच वॉटसनने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो हा विक्रम करु शकण्याची शक्यताही नाही.
रविचंद्रन आश्विन – भारत
भारताचा दिग्गज गोलंदाज रविचंद्रन आश्विनचे या यादीत नाव पाहुन सर्वांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. परंतु हे सत्य आहे की, भारताच्या या फिरकी गोलंदाजाला अद्याप एका एकदिवसीय सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील पाच खेळाडूंना बाद करता आलेले नाही.
आश्विनने आतापर्यंत खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये तब्बल 150 विकेट घेतल्या आहेत. त्यात युएई (युनायटेड अरब अमिराती) संघाविरुद्ध खेळताना आश्विनने सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. त्या सामन्यात आश्विनने 4 बळी टिपले होते.
एकदिवसीय सामन्यात पाच बळी टिपण्यात अद्याप अयशस्वी ठरलेल्या आश्विनने कसोटी सामन्यांमध्ये मात्र अनेकदा पाच बळी टिपले आहेत. आश्विन आताही भारताकडून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म पाहता तो एखाद्या एकदिवसीय सामन्यात हा विक्रम देखील करु शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.