वनडे क्रिकेटमध्ये असे अनेक अष्टपैलू क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजी करतानाही शानदार कामगिरी केली आहे. त्यातील काहींनी एकाच वनडेत सलामीला फलंदाजी आणि सलामीला गोलंदाजी (डावाच्या पहिल्या २ षटकात गोलंदाजी) करण्याचा कारनामा अनेकदा केला आहे.
पण भारतात मात्र असे अष्टपैलू खेळाडू क्वचितच झाले आहेत. पण असे असले तरी काहीवेळेस खेळपट्टी आणि परिस्थितीपाहून पार्ट टाईम गोलंदांना डावाच्या पहिल्या २ षटकांपैकी एका षटकात गोलंदाजी करण्याती संधी देण्यात आली आहे, तसेच काहीवेळेस नियमित सलामीवीर फलंदाजाऐवजी एखाद्या गोलंदाजाला सलामीला पाठवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
या लेखात अशा ५ भारतीय खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे ज्यांनी एकाच वनडेत सलामीला फलंदाजी आणि सलामीला गोलंदाजी केली आहे.
५. कपिल देव – १ वनडे
१९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव हे भारताचे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत, यात शंका नाही. त्यांनी अनेकदा त्यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहेत. ते बऱ्याचदा खालच्या फळीत फलंदाजी करायचे.
पण १९९२ च्या विश्वचषकात त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी के. श्रीकांत यांच्यासह सलामीला फलंदाजी केली होती. त्यावेळी त्यांनी एक षटकारही मारला होता. मात्र ते १० धावांवर बाद झाले. त्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने ८१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
गोलंदाजी करताना मात्र कपिल यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांनी भारताकडून सुरुवातीची षटकेही टाकली होती. त्या सामन्यात झिम्बाब्वे फलंदाजी करत असताना पावसाचा व्यत्यय आल्याने भारत ५५ धावांनी सामना जिंकल्याचे घोषित करण्यात आले. त्या सामन्यात कपिल यांना ४ षटकेच गोलंदाजी करता आली पण या ४ षटकात त्यांनी ६ धावाच दिल्या.
४. विरेंद्र सेहवाग – १ वनडे
भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग हा एक चांगला पार्ट-टाईम गोलंदाजही होता. तो सुरुवातीला नियमीत गोलंदाजीही करायचा. त्यामुळे एकदा २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मुंबईला झालेल्या वनडेत त्याला कर्णधार राहुल द्रविडने डावाच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यास दिली होती.
पण सेहवागने टाकलेल्या त्या षटकात रिकी पाँटिंग आणि ऍडम गिलख्रिस्टने मिळून १४ धावा चोपल्या होत्या. त्याने एकूण ४ षटके गोलंदाजी करताना एकूण २८ धावा दिल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताला २८७ धावांचे लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीला उतरलेला सेहवाग मात्र पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला होता. हा सामना भारताने ७७ धावांनी गमावला होता.
३. इरफान पठाण – १ वनडे
एकेकाळी कपिल देव यांच्याशी तुलना होणाऱ्या इरफान पठाणचाही एकाच वनडेत सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात एक गोलंदाज म्हणून झाली होती. तसेच तो गरज लागेल तेव्हा फलंदाजी करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू होता. पण ग्रेग चॅपेल यांच्या मार्गदर्शनाखाली इरफानने फलंदाजीतही प्रगती केली. त्याने त्यावेली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना काही चांगल्या खेळीही केल्या.
२५ नोव्हेंबर २००५ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या वनडेत सलामीला फलंदाजी करण्याचीही संधी देण्यात आली. पण तो दुसराच चेंडू खेळताना शुन्य धावेवर बाद झाला. त्या सामन्यात भारताला केवळ १८८ धावाच करता आल्या होत्या. त्या सामन्यात इरफानने सलामीला गोलंदाजीही केली. त्याने त्या सामन्यात दुसरे षटक टाकले होते. त्या षटकात त्याने ६ धावा दिल्या होत्या.
पण त्या सामन्यात इरफानसह कोणत्याच भारतीय गोलंदाजाला विकेट्स घेता आल्या नव्हत्या. हा सामना भारताने १० विकेट्सने गमावला होता.
२. रॉजर बिन्नी – २ वनडे
भारताचे माजी गोलंदाज रॉजर बिन्नी हे त्यांच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखले गेले. त्यांना अनेकदा सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी दिली जायची. ते १९८३ च्या विश्वचषकातही भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीत ७२ वनडे सामने खेळताना ७७ विकेट्स घेतल्या आहेत.
प्रामुख्याने गोलंदाज असलेल्या बिन्नी यांनी १९८०-८१ च्या बेन्सन आणि हेजेस वर्ल्ड सिरिजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी आणि मेलबर्न येथे झालेल्या २ वनडेत सुनील गावसकरांबरोबर सलामीला फलंदाजी केली होती. सिडनीमध्ये त्यांनी ३१ धावा तर मेलबर्नमध्ये २१ धावा सलामीला फलंदाजी करताना केल्या होत्या.
या दोन्ही सामन्यात त्यांनी सलामीला गोलंदाजीही केली होती. पण या दोन सामन्यांनंतर त्यांना कधी वनडे सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
१. मनोज प्रभाकर – ४५ वनडे
भारताकडून वनडेत सर्वाधिकवेळा एकाच सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याचा विक्रम मनोज प्रभाकर यांच्या नावावर आहे. त्यांनी भारताकडून १३० वनडे सामने खेळले असून यात १८५८ धावा आणि १५७ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यांनी ४५ वेळा वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे.
त्यांनी २६ मार्च १९८७ ला पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. जमशेदपूरला झालेल्या त्या सामन्यात त्यांनी गावसकरांबरोबर सलामीला फलंदाजी करताना १०६ धावांची शतकी खेळी देखील केली होती. तसेच त्याच सामन्यात सलामीला गोलंदाजीही केली होती.
मात्र त्यांच्यावर मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप झाल्याने त्यांची कारकिर्दीलाही १९९६ नंतर पूर्णविराम लागाला.
ट्रेंडिंग लेख –
टीम इंडियाचे ४ असे कर्णधार, जे फारसे कुणाच्याही लक्षात नाहीत…
ड्रग्ज घेतल्यामुळे बंदी आलेले जगातील ५ क्रिकेटपटू, दोन आहेत…
जागतिक क्रिकेटमधील असे गोलंदाज, ज्यांनी घेतल्या आहेत ४ हॅट्रिक