ऑलिम्पिक 2024 पॅरिसमध्ये आयोजित केलं जाणार आहे. जगातील हा सर्वात मोठा क्रीडा महाकुंभ 26 जुलै रोजी सुरू होऊन 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
यापूर्वी 2020 मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं फक्त एक सुवर्णपदक जिंकलं होतं. भालाफेकपटू नीरज चोप्रानं भारताला हे पदक मिळवून दिलं होतं. आता पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आणखी खेळाडूंकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा पाच भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतात.
(1) नीरज चोप्रा – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. त्यानं 87.58 मीटर भालाफेक केली होती. गेल्यावेळेप्रमाणे या वेळीही नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. ऑलिम्पिकशिवाय नीरजनं जागतिक चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यामुळे आता या ऑलिम्पिकमध्ये त्याचा खेळ कसा राहतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
(2) पी.व्ही. सिंधू – यावेळी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू सुवर्णपदक जिंकेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. सिंधूनं ऑलिम्पिकमध्ये एक नाही तर दोन पदके जिंकली आहेत. 2020 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं चीनच्या बिंग जिओचा पराभव करून कांस्यपदक जिंकलं होतं. तर 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं रौप्यपदक जिंकलं होतं. ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
(3) लव्हलिना बोरगोहेन – भारताची स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनकडून यावेळी सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. तिनं 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. या वेळी स्वत: लव्हलिनानं सांगितलं आहे की, तिचं लक्ष्य सुवर्णपदकावर आहे. यासाठी तिनं तिच्या खेळात अनेक बदल केले आहेत.
(4) मीराबाई चानू – वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. आता ती पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील पात्र ठरली आहे. या वेळी तिच्याकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
(5) निखत जरीन – भारताची स्टार बॉक्सर निखत जरीन पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून आपल्या चमकदार कामगिरीनं चर्चेत असलेल्या जरीनचं हे पहिलंच ऑलिम्पिक आहे. मात्र तिनं दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही! वयाच्या 58व्या वर्षी ऑलिम्पिक पदार्पण करणार ही महिला खेळाडू
ऑलिम्पिकमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा किती पुढे? दोन्ही देशांनी आतापर्यंत किती पदकं जिंकली? जाणून घ्या
जेव्हा जेम्स अँडरसननं बॉक्सिंगमध्ये हात आजमावला! ॲशेस मालिकेपूर्वी झाला होता घोळ