भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे, टी२० सामन्यांच्या मालिकांचा टप्पा पार पाडल्यानंतर हे दोन्ही संघ कसोटी मालिका खेळत आहेत. शनिवारपासून (२६ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. या सामन्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळणार आहे. हा सामना जिंकत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत रहाणेला स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याची सुवर्णसंधी आहे.
रहाणेला जगातील सर्वश्रेष्ट कसोटी फलंदाजांमध्ये गणले जाते. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मैदानावर अधिकाधिक धावा बनवण्याची त्याच्यात क्षमता आहे. आजवर ६६ कसोटी सामने खेळलेल्या रहाणेने ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात शतक लगावण्याचा शानदार विक्रम केला आहे. ६ वर्षांपुर्वी म्हणजेच २०१४ साली रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती.
या सामन्यात रहाणेने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १४७ धावांची अफलातून खेळी केली होती. यात २१ चौकारांचा समावेश होता. एवढेच नव्हे तर, रहाणेव्यतिरिक्त विराटनेही या सामन्यात शतक ठोकले होते. १८ चौकारांच्या मदतीने त्याने १६९ धावांची अफलातून खेळी केली होती.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात आतापर्यंत केवळ ५ भारतीय फलंदाज शतक लगावू शकले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने १९९९मध्ये सर्वप्रथम हा पराक्रम केला होता. त्यावेळी त्याने ११६ धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर २००३ मध्ये विरेंद्र सेहवागने १९५ धावा करत हा विक्रम नोंदवला होता. तसेच टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारानेही ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत शतक करण्याची कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत शतक लगावणारे ५ भारतीय फलंदाज-
११६ धावा- सचिन तेंडूलकर (१९९९)
१९५ धावा- विरेंद्र सेहवाग (२००३)
१६९ धावा- विराट कोहली (२०१४)
१४७ धावा- अजिंक्य रहाणे (२०१४)
१०६ धावा- चेतेश्वर पुजारा (२०१८)
महत्त्वाच्या बातम्या-
“अजिंक्य स्वभावाने जरी शांत दिसत असला तरी तो आक्रमक कर्णधार”, पाहा कोणी केलंय हे विधान
‘विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे सोन्यासारखी संधी’
मायदेशी परतण्यापूर्वी कोहलीने ‘हा’ संदेश देत वाढवले संघाचे मनोबल; अजिंक्य रहाणेने केला उलगडा