जागतिक क्रिकेटमधील मागील २ दशकांवर जर डोकावून पाहिले, तर भारतीय क्रिकेट संघ आणि खेळाडूंचा दबदबा दिसून येतो. सध्याच्या घडीला भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत तसेच प्रतिभावान युवा खेळाडूही आहेत, जेणेकरून भारतीय संघाचे भविष्य मजबूत दिसते. असे असले तरीही भारतीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत, जे देशांतर्गत स्तरावर सातत्याने उत्तम कामगिरी करत आहेत. परंतु असे असले तरीही ते भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करण्यात अपयशी ठरले.
खेळाडूंमध्ये प्रतिभेची कमतरता नाही. परंतु संघ व्यवस्थापनाकडून या खेळाडूंच्या प्रतिभेचा योग्य वापर न झाल्यामुळे, हे खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव बनवू शकले नाहीत.
आज या लेखात आपण भारतीय क्रिकेट संघाच्या अशाच ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे अनेक काळापासून चांगली कामगिरी करत आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमविण्याची क्षमताही ठेवतात. परंतु त्यांना संधी न मिळाल्यामुळे ते आपली प्रतिभा आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवू शकले नाहीत
५. जलज सक्सेना
मध्यप्रदेश संघाचा अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेनाला (Jalaj Saxena) भारतीय संघात स्थान बनविणे खूपच कठीण दिसते आहे. खरंतर सक्सेनाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. परंतु त्याला भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी खटाटोप करावा लागल्याचे दिसते. खरंतर सक्सेना फिरकीपटू अष्टपैलू आहे आणि सध्या भारतीय संघाकडे फॉर्ममध्ये असलेला रविंद्र जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे जडेजाच्या उपस्थितीत संघ व्यवस्थापनाने सक्सेनाला संधी देणे कठीण आहे.
सक्सेनाचे वय सध्या ३३ वर्ष आहे आणि आतापर्यंत त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही. इथून पुढेही त्याला संधी मिळण्याची आशा जवळपास संपली आहे. अशामध्ये भारतीय क्रिकेटने सक्सेनाला संघात संधी न देऊन त्याच्यात असलेल्या प्रतिभेचा वापर केला नाही, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सक्सेनाने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये १२३ प्रथम श्रेणी सामने, ९३ अ दर्जाचे सामने आणि ५४ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६३३४ धावांबरोबरच ३४७ विकेट्सही घेतल्या आहेत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने १८८४ धावा केल्या असून १०८ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने ६३३ धावा केल्या असून ४९ विकेट्स घेतल्या आहेत.
४. अक्षय वाखरे
विदर्भ क्रिकेट संघाचा फिरकीपटू गोलंदाज अक्षय वाखरे (Akshay Wakhre) याचाही त्या खेळाडूंच्या यादीत समावेश होतो, ज्यांच्या प्रतिभेचा वापर भारतीय संघासाठी करण्यात आला नाही. त्याच्यात प्रतिभा तर आहे. परंतु भारतीय संघात त्याला स्थान मिळविता आले नाही. अक्षय हा एक फिरकीपटू गोलंदाज आहे आणि भारतीय संघाकडे आर अश्विन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांसारखे उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. अशामध्ये संघ व्यवस्थापनाकडून अक्षयला संधी मिळणे जवळपास कठीणच नव्हे तर अशक्य दिसत आहे. कारण अक्षयला संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा भारतीय संघाला फिरकीपटू गोलंदाजाची आवश्यकता भासेल.
परंतु भारतीय संघात उपस्थित असलेल्या फिरकीपटूंची फीटनेस उत्तम आहे आणि ते सातत्याने भारतीय संघात चांगली गोलंदाजी करत आहेत. इतकेच नव्हे तर खालच्या फळीत फलंदाजीला येऊन भारतीय संघाच्या धावसंख्येत वाढ करण्याची धमकही त्यांच्यात आहे.
अक्षयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना ८३ प्रथम श्रेणी सामने, ४८ अ दर्जाचे सामने आणि ४६ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने २८.५९ च्या सरासरीने २७९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने २८.९३ च्या सरासरीने ५८ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने २५.१४ च्या सरासरीने ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
३. सूर्यकुमार यादव
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट संघाचा सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) हे नाव फार मोठे आहे. या विस्फोटक फलंदाजाने मागील काही स्पर्धांमध्ये आपल्या फलंदाजीने दिलखुलास खेळी केल्या आहेत. परंतु इतकी प्रतिभा असूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. यादवसाठी तर हरभजन सिंग यासारख्या खेळाडूने सोशल मीडियावर नाव सूचवले. परंतु तरीही त्याला संघात स्थान मिळाले नाही. सध्या भारतीय संघात अनेक चांगले फलंदाज असल्याने आता यादवला संघात स्थान मिळण्याच्या संधीही खूप कमी आहेत.
यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७७ प्रथम श्रेणी सामने, ९३ अ दर्जाचे सामने आणि १४९ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४४.०१ च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ३५.४६ च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत, तर टी२०त त्याने ३१.३७ च्या सरासरीने ३०१२ धावा केल्या आहेत.
२. हर्षल पटेल
हरियाणा संघाचा अष्टपैलू हर्षल पटेलने (Harshal Patel) देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत चांगले नाव कमावले आहे. परंतु त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. खरंतर सध्या भारतीय संघाकडे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आहे. पंड्याच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने शिवम दुबेला संघात सामील केले. तरीही दुबेला गोलंदाजीसाठी अधिक संधी मिळाली नाही. परंतु फलंदाजी करताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पंड्याचा पर्याय पाहिला, तर संघ व्यवस्थापनाकडे दुबे पर्याय म्हणून आहे.
अशामध्ये हर्षलला राष्ट्रीय संघात स्थान मिळणे खूप कठीण आहे. हर्षल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. तिथे तो वेगवान गोलंदाजीबरोबर फलंदाजीनेही संघासाठी उत्तम कामगिरी करतो.
त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६४ प्रथम श्रेणी सामने, ५७ अ दर्जाचे सामने आणि ९१ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३६३ धावा आणि २२६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ५७० धावा आणि ८० विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने ७६६ धावा आणि ९५ विकेट्स घेतल्या आहेत.
१. प्रियांक पांचाळ
गुजरात क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज प्रियांक पांचाळदेखील (Priyank Panchal) त्या खेळाडूंच्या यादीत सामील आहे, ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. परंतु राष्ट्रीय संघात मात्र त्याला स्थान मिळाले नाही. पांचाळसाठी इथून पुढेही संघात संधी मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत.
पांचाळने सलामीला फलंदाजी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु भारताकडे मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करत कसोटीत खेळत आहेत. इतकेच नव्हे, तर पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांनादेखील भारतीय संघात सामील केले आहे. परंतु गिलला अजून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. तसेच मर्यादीत षटकांसाठी भारताकडे रोहित, शिखर धवन, केएल राहुल, शॉ असे अनेक पर्याय आहेत.
अशामध्ये असे म्हणणे वावगे ठरणार नाही, की सलामीला फलंदाजी करण्याची जागा रिकामीच नाही आणि पांचाळला संधी मिळणे अशक्य आहे. आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर पांचाळने आतापर्यंत ९८ प्रथम श्रेणी सामने, ६८ अ दर्जाचे सामने आणि ४३ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने प्रथम श्रेणीत ४५.६३ च्या सरासरीने ६८९१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ३९.९० च्या सरासरीने २५९४ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त त्याने २७.५१ च्या सरासरीने १०७३ धावा केल्या आहेत.