भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. कोहलीने एकाकी झुंज देत संघाला १५६ धावांपर्यंत पोहचवले. हे आव्हान इंग्लंड संघाने ८ गडी राखून १८.२ षटकातच पूर्ण केले.
इंग्लंड संघाकडून जोस बटलरने आक्रमक ८३ धावांची खेळी करत भारतीय संघाकडून सामना हिसकावून घेतला. चला तर पाहूया या सामन्यातील ५ भारतीय खेळाडू ज्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
१) केएल राहुल –
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज केएल राहुल हा गेल्या काही सामन्यापासून भारतीय संघासाठी निराशाजनक कामगिरी करत आहे. त्याने खेळलेल्या शेवटच्या चार सामन्यात तो तीन वेळेस ० धावांवर बाद झाला आहे. तिसऱ्या सामन्यात देखील तो ० धावांवर बाद झाला. मार्क वूडने तिसऱ्याच षटकात त्याच्या त्रिफळा गुल करत त्याला माघारी पाठवले. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यामुळे भारतीय संघाला मोठ्या धावांचा डोंगर उभारता आला नाही.
२) इशान किशन –
भारतीय संघाचा युवा फलंदाज इशान किशनने इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ५६ धावांची आक्रमक खेळी केली होती. परंतु या सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. ९ चेंडू खेळत त्याने अवघ्या ४ धावा केल्या. जॉर्डनने टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर तो पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
३) श्रेयस अय्यर –
भारतीय संघासाठी ६व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यरला देखील या सामन्यात साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्याच चेंडूवर कव्हरच्या दिशेने चौकार मारत त्याने आपल्या खेळीची सुरुवात केली होती. परंतु त्याला जास्त धावा करता आल्या नाही. अवघ्या ९ धावा करत तो माघारी परतला. मार्क वूडने टाकलेल्या चेंडूला अय्यरने टोलवण्याचा प्रयत्न केला आणि मलानच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.
४) युजवेंद्र चहल –
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल या सामन्यात देखील महागडा ठरला. तसेच या मालिकेतील ३ सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तिसऱ्या टी -२० सामन्यात त्याने ४ षटक गोलंदाजी करत ४१ धावा खर्च केल्या आणि एकच गडी बाद करण्यात त्याला यश आले.
५) शार्दुल ठाकूर :
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १५६ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघातील गोलंदाजांसमोर इंग्लंड संघातील फलंदाजांना लवकर माघारी धाडण्याची जबाबदारी होती. मात्र संघातील वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने या सामन्यात ३.२ षटक गोलंदाजी करत ३६ धावा खर्च केल्या. यात त्याला एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडला रोखण्यात अपयश आले.
महत्वाच्या बातम्या:
किंग कोहलीचा मोठा पराक्रम! या विक्रमाच्या यादीत सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
तिसऱ्या टी२० सामन्यातील पराभवानंतर कोहली निराश होत म्हणाला, माझ्या खेळीचा काय उपयोग, जर