२००६ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये अनेक असे खेळाडू होते, ज्यांना आज दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांपैकीच एक म्हणजे हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा. भारताचा वनडे, टी२०चा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासुनच एक महान खेळाडू म्हणून मानला जातो. रोहितच्या शानदार कामगिरीमुळेच त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आत्ता तो भारतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००६ च्या वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत रोहितशिवाय इतर ५ खेळाडू होते, जे सध्या भारतीय संघाचा भाग आहेत. या लेखात आपण त्या ५ खेळाडुंबद्दल जाणून घेणार आहाेत.
५. शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem)
२००६ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मासोबत फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम सुद्धा होता. नदीमला त्या स्पर्धेत फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने ७ षटके टाकत १ गडी बाद केला होता.
४. इशांत शर्मा (Ishant Sharma)
भारतासाठी तिन्ही फाॅरमॅटमध्ये खेळलेला आणि सध्याचा कसोटीतील वेगवान गोलंदाज इशांत शर्मासुद्धा २००६ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा भाग होता. या गोलंदाजाला त्या स्पर्धेत एकदाही आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही. या स्पर्धेत त्याला संधी मिळाली नसली तरी पुढच्याच वर्षी त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव
३. पियुष चावला (Piyush Chawla)
२००६ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पियुष चावलाने सर्वाधिक गडी बाद केले होते. चावलाला त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला भविष्यातील स्टार मानला जात होता आणि अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर त्याच्याऐवजी चावला त्याची कमी भरून काढेल असे वाटत होते. चावला त्याच्या सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाला असला तरी त्याचे यश फार काळ टीकला नाही आणि त्याला संघातील स्थान गमवावे लागले. सध्या चावला कोणत्याच फाॅरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग नाही.
२. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)
आपल्या कारकिर्दीत दोनवेळा १९ वर्षाखालील विश्वचषक खेळणारा खेळाडू म्हणजे रविंद्र जडेजा. तो २००८ च्या अगोदर २००६ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होता. जडेजाला मात्र त्याच्या पहिल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात तेवढे यश मिळाले नव्हते. जडेजाने सामन्यात ३४ धावा आणि ४ बळी घेतले. त्यावेळी रोहित शर्मा देखील याच संघाचा भाग होता आणि आजही हे दोन्ही खेळाडू भारतीय संघात एकत्र खेळतात.
१. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
भारतीय कसोटी संघाचा ३ नंबरचा स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारा हा देखील २००६ च्या १९ वर्षाखालील विश्वचषकामध्ये रोहित शर्मासोबत भारतीय संघाचा भाग होता. पुजारा त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ६ सामन्यात ११६.३३ च्या सरासरीने ३४९ धावा केल्या. भारताला अंतिम फेरीत नेण्यात पुजाराची शानदार फलंदाजी मोलाची ठरली होती.
काही वर्षांपुर्वी १९ वर्षाखालीलविश्वचषक ही स्पर्धा युवा खेळाडूंना मोठ्या स्तरावर सिद्ध होण्याची एक संधी होती. पण आता वेगवेगळ्या टी-२० स्पर्धांमुळे तरुणांना भरपुर संधी उपलब्ध झाल्या आहेत. १९ वर्षाखालील विश्वचषकाने जगाला अनेक खेळाडू दिले आहेत. युवराज सिंह, विराट कोहली, रविंद्र जडेजा हे खेळाडू या स्पर्धेमुळेच चर्चेत आले.
सध्या १९ वर्षाखालील युवा खेळाडूंची विश्वचषक स्पर्धा २०२२ सुरु झाली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ४५ धावांनी पराभूत केले आहे. या विजयाचे शिल्पकार कर्णधार यश धुल आणि गोलंदाज विक्की ओस्तवाल राहिले.
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड तरसतायेत एका कसोटी मालिका विजयासाठी! नजीकची कामगिरी लाज आणणारी
विराटच्या राजीनाम्यानंतर तापले राजकारण! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जय शहांना टोला
हेही पाहा-