नवी दिल्ली – भारतीय संघ हा टी-20 चा विश्वचषक जिंकणारा जगातील ‘पहिला संघ’ आहे. तेव्हापासून आतापर्यंत भारताने एक संघ म्हणून ट्वेंटी-ट्वेंटीच्या विश्वात आपला दबदबा कायम राखला आहे.
भारताने 2007 साली टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. परंतु, त्यानंतर भारताला पुन्हा हा विश्वचषक जिंकता आला नाही. भारतीय संघाने 2014 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली. मात्र, विश्वचषक जिंकता आला नाही. तसेच 2016 मध्येही भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.
भारताच्या ताफ्यात ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारे फलंदाज…
भारतीय संघ मुळातच फलंदाजांचा संघ म्हणून ओळखला जातो. त्यातही वीस षटकाचे सामने खेळताना जोरदार फटके लगावण्यात भारतीय खेळाडू निपुण आहेत. यात प्रकर्षाने नाव घ्यावे लागते, ते युवराज सिंग या खेळाडूचे. युवराज सिंगने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम केलेला आहे. 2007 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही युवराजचा समावेश होता. त्यावेळी इंग्लंड संघातील स्टुअर्ड ब्रॉड या गोलंदाजाच्या सहाही चेंडूंवर त्याने लगावलेले लागोपाट सहा षटकार, हा विक्रम युवराजच्यास क्रिकेट कारकिर्दीतील मेरुमणी आहे. युवराज सिंह प्रमाणेच महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, मनिष पांडे, राहुल लोकेश, हार्दिक पंड्या, सुरेश रैना हे खेळाडू देखील लांबलचक षटकार खेचण्यात निपुण आहे.
या लेखात आपण भारतीय संघातील असे 5 खेळाडू पाहणार आहोत; ज्यांनी टी-20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकारांची आतिशबाजी केलेली आहे.
५. सुरेश रैना – 12 षटकार
भारतीय संघाकडून वीस षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक झळकावणारा खेळाडू म्हणून सुरेश रैनाचा लौकिक आहे. रैना 2009 मध्ये पहिल्यांदा टी-20 विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर मात्र तो प्रत्येक टी-20 विश्वचषकात भारतीय संघात सहभागी झाला आहे.
सुरेश रैनाने आतापर्यंतच्या टी-20 विश्वचषकाच्या कारकिर्दीत एकुण 26 सामने खेळले आहेत. त्यात त्याला 21 डावांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या 21 डावांमध्ये फलंदाजी करताना सुरेश रैनाने तब्बल 12 षटकार लगावले आहेत. त्यात 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रैनाने सर्वाधिक 5 षटकार लगावले होते. तसेच त्याच सामन्यात सुरेश रैनाने आपले पहिले शतक झळकावले होते.
४. महेंद्रसिंग धोनी – 16 षटकार
भारताचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हा आजपर्यंत प्रत्येक टी-20 विश्वचषकात खेळला आहे आणि संघाचे नेतृत्व देखील त्यानेच केले आहे. तसेच धोनीच्याच नेतृत्वात भारताने पहिलावहिला आणि आतापर्यंतचा एकमेव टी-20 विश्वचषक 2007 साली जिंकला होता.
ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात भारताचा भरवशाचा फलंदाज असणारा धोनी हा मोठमोठे षटकार ठोकण्यात पटाईत आहे. त्याच्या मनगटात असलेल्या ताकदीमुळे तो लांबलचक षटकार देखील लगावतो.
विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक 33 सामने खेळताना धोनीने 29 डावात फलंदाजी केली आहे. त्यात त्याने एकूण 16 षटकार लगावले आहेत. तसेच एका सामन्यात 2 षटकार ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
३. विराट कोहली – 19 षटकार
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा 2012 पासून आजपर्यंतच्या प्रत्येक टी-20 विश्वचषकात संघाकडून खेळला आहे. महत्वाची बाब म्हणजे जगातील एक दिग्गज टी-20 खेळाडू असलेला विराट मागील लागोपाट दोन्ही टी-20 विश्वचषकात ‘मालिकावीर’ किताबाचा मानकरी झाला आहे. तसेच 2012 च्या विश्वचषकात देखील विराटची कामगिरी वाखण्याजोगी राहिली आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात एकूण 16 सामने खेळले आहेत. त्यात त्याने तब्बल 19 षटकार लगावले आहेत. श्रीलंकेविरुद्दच्या एका सामन्यात त्याने खेचलेले 4 षटकार, ही त्याची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे भारताने तो सामना गमावला होता.
२. रोहित शर्मा – 24 षटकार
भारतीय संघातील सलामीचा तडाखेबाज फलंदाज आणि टी-20 प्रकारात जगातील एक दिग्गज म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते. चेंडू टोलावण्याची रोहितची आक्रमकता पाहता त्याला ‘हिट-मॅन’ असेही म्हटले जाते. महेंद्रसिंग धोनी प्रमाणेच रोहित देखील आतापर्यंतच्या सर्वच टी-20 विश्वचषकात सहभागी झाला आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात एकूण 20 सामने खेळले आहेत. त्यात 25 डावात त्याने फलंदाजी केली आहे. रोहितने या सर्व डावांमध्ये फलंदाजी करताना तब्बल 24 षटकार खेचले आहेत. तसेच एका सामन्यात सर्वाधिक 6 षटकार ही रोहितची सर्वोत्तम कामगिरी आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्धचा होता. जो की,रोहितच्या तुफान फलंदाजीनंतरही भारताने गमावला होता.
१. युवराज सिंग – 33 षटकार
षटकारांची चर्चा होत असेल तेव्हा ‘युवी’चे नाव पुढे येणार नाही, हे शक्य नाही. खणखणीत ‘षटकारांचा बादशाह’ म्हणून युवराज सिंगचा नावलौकीक क्रिकेट जगतात आहे. फक्त भारतातील नव्हे तर टी-20 क्रिडा प्रकारात जगातील दिग्गजांमध्ये युवराजचा समावेश होतो. याचे कारण या क्रिडा प्रकाराला लोकप्रिय करण्यात युवराजचा मोलाचा वाटा आहे.
आपण पाहत असलेल्या यादीत युवराज हा अद्याप टॉपवर आहे. तसेच त्याच्या जवळपास कोणता खेळाडू असलेला दिसत नाही. युवराज सिंग भलेही क्रिकेटमधून निवृत्त झाला असेल; मात्र, टी-20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार खेचणाऱ्यांच्या यादीत युवराज 33 षटकारांसह अग्रस्थानी आहे.
2007 ते 2016 पर्यंत झालेल्या प्रत्येक टी-20 विश्वचषकात युवराजने सहभाग घेतलेला आहे. यात त्याने एकूण 31 सामने खेळले आहे. ज्यात 28 डावात फलंदाजी करताना युवराजने एकूण 33 षटकारांची बरसात केली आहे. शिवाय एका सामन्यात 7 षटकार ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. हा तोच सामना आहे, ज्यात त्याने इंग्लंड संघातील गोलंदाज स्टुअर्ड ब्रॉडच्या सहाही चेंडूवर सहा षटकार खेचण्याचा विक्रम (2007) युवराजने केला होता.