पांढरपेशा समाजातील खेळ ते सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा क्रिडा प्रकार, असा आजपर्यंतचा क्रिकेटचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र, क्रिकेटच्या या प्रवासात अनेक नकारात्मक बाबी देखील या खेळाला चिकटल्या आहेत. क्वचितच आढळणारा खेळाडूंमधील अतिआत्मविश्वास आता खेळाडूंमध्ये, त्यांच्या वागणूकीतून सर्रास दिसून येत आहे. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंबाबत शेरेबाजी, तिरकस टिप्पणी (स्लेजिंग) करण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसत आहे.
आजच्या या लेखात आपण असे काही खेळाडू आणि क्रिकेटच्या इतिहासातील प्रसंग पाहणार आहोत, जिथे खेळाडूंचा अतिआत्मविश्वास आणि प्रतिस्पर्धी खेळाडूसोबत स्लेजिंग (शेरेबाजी) करणे, त्यांच्याच अंगलट आल्याचे दिसून आले होते.
“बहुधा मैदानावर शेरेबाजी करणे अथवा अतिआत्मविश्वासाने प्रतिस्पर्ध्यांबाबत एखादे विधान करणे, याला सध्या खेळाडू ‘एक हत्यार’ समजतात. ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकरण वगैरे होते, असा दावा केला जातो. मात्र, यात तितके तथ्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्या ठिकाणी खेळाडूंना त्यांचा अतिआत्मविश्वास नडल्याचे दिसून आले.”
#5 – स्टिवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड
2015 सालच्या अॅशेस मालिकेच्या अगोदर ऑस्ट्रेलिया संघातील प्रमुख खेळाडू स्टिवन स्मिथ याने इंग्लंड संघाविरोधात एक वक्तव्य केले होते. ज्यात स्मिथने, “ते(इंग्लंड संघ) आम्हाला या मालिकेत बिलकूल टक्कर देऊ शकणार नाहीत” असे म्हटले होते. याचे कारण सदर मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत आणि वेस्ट इंडीज संघाविरुद्ध चांगल्या कामगिरीसह यश पदरात पाडून आला होता. त्यामुळे स्टिवन स्मिथच्या बोलण्यातून त्याचा आत्मविश्वास बाहेर पडत होता.
स्टिवन स्मिथच्या या वक्तव्यानंतर अॅशेस मालिकेचा जो निकाल सर्वांपुढे होता, तो मात्र निश्चितच धक्कादायक होता. इंग्लंडच्या संघाने त्या संपुर्ण मालिकेवर आपले वर्चस्व ठेवले होते. तसेच ती संपूर्ण मालिका इंग्लंडने 3-2 अशा फरकाने आपल्या खिशात टाकली होती.
त्यामुळे स्टिवन स्मिथने जे वक्तव्य केले होते, ते त्यांच्यावरच उलटलेले दिसून आले. जे तीन सामने ऑस्ट्रेलिया संघाने गमावले, त्यातही अगदी लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. यापैकी पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघ 169 धावांनी हरला होता. त्यानंतर तीसरा सामना इंग्लंडने 8 विकेट राखून जिंकला होता. तर चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला अगदी एक डाव आणि 78 धावांनी मात खावी लागली होती.
#4 – ए.बी. डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी महान खेळाडू आणि कसोटी संघाचा पुर्व कर्णधार ए.बी. डिविलियर्स, त्याच्या आयुष्यातील इंग्लंड संघाविरुद्धची ‘ती’ एक मालिका संपूर्ण आयुष्यात विसरु शकणार नाही. संघाचा कर्णधार असूनही ‘एबी’ त्यावेळी लागोपाट तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता.
एखाद्या खेळाडूचे शुन्यावर बाद होणे तसे नवीन नाही. मात्र, ए.बी. डिविलियर्स बाबतची गोष्ट तेव्हा थोडी निराळी होती. याचे कारण मालिका सुरु होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एबीने अतिआत्मविश्वास दाखवत काही वक्तव्ये केली होती. ते सर्व पाहता त्याने स्वतः तीन वेळा शुन्यावर बाद होणे, म्हणजे स्वतःचा वार स्वतःवर उलटण्यासारखे होते.
ए.बी. डिविलियर्सने मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना इंग्लंडचा संघ जणू आपल्यापुढे आव्हान देऊ शकणार नाही, असे वक्तव्य केले होते. “इंग्लंडच्या गोलंदाजांकडे भरपूर अनुभव आहे. परंतु त्यांचे अनेक गोलंदाज आपली गती हरवून बसले आहेत. तसेच त्यांचा संघ (इंग्लंड) आता असा राहिला नाही की, ज्याला हरवता येणार नाही. याचे कारण आम्हालाही आमच्यावर पुर्ण विश्वास आहे.” असे एबीने त्यावेळी पत्रकार परिषदेत म्हटले होते.
#3 – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध न्युझीलंड
हा सामना आहे, 2015 सालच्या विश्वचषक स्पर्धेतील. त्यावेळी ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडचा संघ समोरासमोर आले होते. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर रंगलेला तो सामना एकप्रकारे ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात टाकलाच होता. परंतु, ऑस्ट्रेलिया संघातील ग्लेन मॅक्सवेलने सामना चालू असताना केलेली स्लेजिंग (शेरेबाजी) त्यांच्याच संघावरच उलटल्याचे दिसले आणि तो सामना न्युझीलंडने ऑस्ट्रेलियाच्या अगदी तोंडातून हिसकावून घेतला.
ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या 151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्युझीलंडचा संघ 146-9 अशा दयनीय अवस्थेत होता. न्युझीलंडला विजयासाठी आणखीन 6 धावा हव्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाला फक्त एक विकेट हवी होती. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने मैदानातूनच न्युझीलंडच्या प्रेक्षकांकडे काही इशारे करत त्यांची खिल्ली उडवली. यानंतर मात्र लगेचच केन विलियमसनने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल मार्श याच्या चेंडूवर एक खणखणीत षटकार मारुन सामना जिंकला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलचा पडलेला चेहरा सर्व प्रेक्षकांनी पाहिला होता.
#2 – एन्ड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड) विरुद्ध भारत
हा सामना तसा आजही सर्व भारतीयांच्या आणि जगातील सर्व क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा आहे. त्यातही या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंनी मैदानात आक्रमकपणे केलेली शेरेबाजी आणि त्यानंतर सामन्याचा आलेला निकाल, यामुळे सदर सामना सर्वांच्याच स्मरणात आहे.
याच सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ड ब्रॉडच्या एका षटकात सहाही चेंडूवर सहा खणखणीत षटकार खेचले होते. तसेच इंग्लंडला हरवून भारत उपांत्य फेरीत पोहचला होता. मात्र असे म्हटले जाते की, युवराजच्या त्या आक्रमक खेळीला एन्ड्र्यू फ्लिंटॉफ कारणीभूत होता. कारण ब्रॉडने गोलंदाजी करण्याअगोदर युवराज आणि फ्लिंटॉफ यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची आणि शेरेबाजी झाली होती.
युवराज सिंगने सामना संपल्यावर दिलेल्या मुलाखतीत त्या संपुर्ण घटनेबाबत सांगितले होते. “फ्लिंटॉफने मला म्हटले होते की, मी मारलेला फटका अगदीच खराब दर्जाचा होता. याचे कारण त्या अगोदर फ्लिंटॉफच्याच षटकात मी सलग दोन चौकार लगावले होते. त्यानंतर तो मला म्हटला होता की, मी तुझा गळा चिरेल. तेव्हा मी त्याला माझी बॅट दाखवली आणि म्हटलो की, तुला माहीत आह, मी या बॅटने तुला कुठे मारु शकतो ते..” असे युवीने आपल्या मुलाखतीत सांगितले होते.
त्यानंतर भारताने हा सामना जिंकला होता आणि अगदी दिमाखात विश्वचषकाच्या उंपात्य सामन्यात धडक दिली होती. मात्र, सामन्यातील त्या शेरेबाजीबद्दल बोलताना युवराजने एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे, “तेव्हा मला निश्चितच खुप राग आला होता. त्यामुळे मी माझ्या बॅटवर आलेला प्रत्येक चेंडू सीमेपलीकडे घालवण्याचा विचार करत होतो. खरेतर अशी शेरेबाजी आणि वागणे, हे कधी कधी तुमच्यासाठी फायद्याचे असते आणि तोट्याचे देखील असते. तेव्हा मला त्याचा फायदा झाला आणि त्यांना तोटा झाला होता, इतकेच” असे युवराज सिंगने म्हटले होते.
#1 आमिर सोहेल (पाकिस्तान) विरुद्ध भारत
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना हा एखाद्या छोटेखानी लढाईसारखाच असतो. दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांच्या प्रचंड दबावाखाली खेळाडू मैदानावर खेळत असतात. त्यामुळेच या दोन्ही संघातील अनेक सामने संस्मरणीय ठरले आहेत. त्यातही 1996 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उभय संघातील सामना क्रिकेट रसिक केव्हाच विसरु शकणार नाहीत.
पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्यात भारताकडून नवज्योत सिंग सिद्धूने 93 धावा आणि अजेय जाडेजाने 25 चेंडूत 45 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने 287 धावांचा फलक बोर्डवर लावला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली होती.
पाकिस्तानचे दोन्ही सलामी फलंदाज सईद अन्वर आणि आमिर सोहेलने आपल्या खेळीने सामना काहीसा पाकिस्तानकडे झुकवला होता. परंतु पाकिस्तानचा धावफलक 84 वर पोहचला असतानाच श्रीनाथने सईद अन्वरला बाद केले. तरिही आमिर सोहेलने भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरुच ठेवली होती.
याच दरम्यान आमिरने व्यंकटेश प्रसादच्या एका षटकात लागोपाट दोन चौकार लगावत त्याला बॅटने काहीसा इशारा केला होता. मात्र, त्याच्या पुढच्याच चेंडूवर व्यंकटेश प्रसादने आमिरचा त्रिफळा उडवला आणि आपल्या खास शैलीत त्याला तंबूचा रस्ता दाखवला होता. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची मैदानावरील त्या शेरेबाजीची प्रचंड चर्चा झाली होती आणि अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणात तो प्रसंग आहे. महत्वाचे म्हणजे भारतानेच तो सामना जिंकला होता आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.