आपल्या देशासाठी एकदातरी विश्वचषक खेळावा आणि दमदार कामगिरी करुन आपल्या देशाला विश्वचषक जिंकून द्यावा. अशी अनेक खेळाडूंची स्वप्ने असतात. पण काही खेळाडू असे असतात ज्यांना त्यांच्या देशाकडून एकदाही विश्वचषक संघात संधी मिळत नाही. या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया अशा 5 क्रिकेटरची नावं ज्यांनी आपल्या देशासाठी कधीही विश्वचषक खेळला नाही.
1) व्हीव्हीएस लक्ष्मण- व्हीव्हीएस लक्ष्मण हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्टायलिश फलंदाजांपैकी एक आहे. लक्ष्मणनं 16 वर्षात भारतासाठी 134 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्यानं अनेक चमकदार खेळी खेळल्या. लक्ष्मण कसोटीत उत्कृष्ट फलंदाज होता, पण तो एकदिवसीय कारकीर्दमध्ये प्रगती करु शकला नाही. लक्ष्मणला 2003च्या विश्वचषक संघात स्थान मिळवण्याची चांगली संधी होती, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळं तो कधीही विश्वचषक खेळू शकला नाही.
2) जस्टीन लँगर- जस्टीन लँगरला अनेक चाहते कसोटी क्रिकेटमधील महान सलामीवीर मानतात. जस्टिन लँगर आणि मॅथ्यू हेडन ही सर्वात धोकादायक सलामीची जोडी होती, परंतू एकदिवसीय सामन्यांमध्ये गिलख्रिस्ट आणि हेडन डावाची सलामी देत असत. लँगरची कसोटीतील आकडेवारी अतिशय प्रभावी आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे रेकाॅर्ड चांगले नाही. लँगरनं फक्त 8 एकदिवसीय सामने खेळले. या कारणामुळे त्याला ऑस्ट्रेलियाकडून विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही.
3) ॲलेस्टर कुक- ॲलेस्टर कुक हा इंग्लंडच्या महान फलंदाजांपैकी एक आहे. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये 12,000 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र, एकदिवसीय सामन्यांमध्ये कुकची कामगिरी खास राहिली नाही. कुकनं 2011च्या विश्वचषकानंतर अँड्र्यू स्ट्रॉसने राजीनामा दिल्यावर एकदिवसीय आणि कसोटी संघांचं कर्णधारपद स्वीकारलं. पण, 2015च्या विश्वचषकापूर्वी त्याला इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडावं लागलं. त्यामुळं त्याला विश्वचषक खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही.
4) स्टुअर्ट मॅकगिल- स्टुअर्ट मॅकगिल (Stuart MacGill) हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. मॅकगिलला ऑस्ट्रेलियाकडून 44 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळायला मिळाले. हा खेळाडूही कधी विश्वचषक खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियामध्ये अनेक धोकादायक वेगवान गोलंदाज होते, त्यामुळे ते फिरकीपटूसोबत किंवा फिरकीपटूशिवाय खेळू शकत होते. त्यामुळं मॅकगिलला ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक खेळता आला नाही.
5) इरापल्ली प्रसन्ना- इरापल्ली प्रसन्ना (Erapalli Prasanna) हा आतापर्यंतच्या महान फिरकीपटू गोलंदाजांपैकी एक आहे. परंतू त्याला भारतासाठी कधीही विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही. प्रसन्नानं भारतासाठी 49 कसोटी सामन्यांमध्ये 189 विकेट्स घेतल्या आहेत. परंतू, निवडकर्त्यांनी त्याचा कधीही एकदिवसीय संघासाठी विचार केला नाही. त्यामुळं तो कधीही भारतासाठी विश्वचषक खेळू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी क्रिकेटरला विश्वास, म्हणाले हे चार खेळाडू भरुन काढणार ‘रोहित-विराटची’ पोकळी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे किती खेळाडू भाग घेत आहेत? कोणत्या राज्यातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक?
सचिनला नाही, ‘या’ भारतीय फलंदाजाला गोलंदाजी करताना अख्तरला फुटायचा घाम