भारतीय कबड्डी संघाचे आणि भारतीय कबड्डी खेळाडूंचे अधिराज्य कबड्डी खेळावर राहिले आहे. कबड्डीची कोणतीही जागतीक स्पर्धा असो भारत त्याचा विजेता असणार हे नेहमीचेच समीकरण असते. भारतीय संघ सलग कबड्डीचे विश्वचषक जिंकला आहे. तर आशियाई स्पर्धेतही गोल्ड मेडल्स आणि दक्षिण आशियाई स्पर्धेतही गोल्ड मेडल्स सतत जिंकत आला आहे. पण भारतीय संघाच्या कारामतीला खिंडार पडण्याचा किंवा भारतीय संघाला आव्हान देताना एक संघ समोर येत आहे तो म्हणजे इराणचा कबड्डी संघ आणि त्यांचे खेळाडू.
गेल्या काही वर्षांत इराणच्या कबड्डी संघाने प्रचंड प्रगती केली आहे. ‘आशियाई स्पर्धा २०१४’ आणि ‘विश्व कप स्पर्धा २०१६’ मध्ये त्यांनी भारताला कसा घाम फोडला होता हे सर्वांनाच माहित आहे! त्यामुळेच यंदाच्या पर्वासाठी झालेल्या लिलावात इराणी खेळाडूंना बरीच मागणी होती. इराणचे बरेच खेळाडू या पर्वात खेळताना दिसतील. त्यामुळे ‘इराण’चे खेळाडू खरेच ‘रान’ पेटवतात का हेच बघायचे आता बाकी आहे!
प्रो कबड्डीतील काही प्रमुख इराणी खेळाडूंवर एक नजर:
१.फझल अत्राचली:
आजमीतीच्या जगातल्या सर्वोत्तम ‘बचावपटूंमध्ये’ या खेळाडूचा समावेश होतो. मागच्या पर्वातील ‘सर्वोत्तम बचावपटू’ ठरलेला फझल ‘डावा कोपरारक्षक’ म्हणून खेळतो.त्याचा ‘अँकल होल्ड’ इतका अप्रतिम असतो की बरेचदा त्याला इतर बाचावपटूंच्या मदतीचीही गरज लागत नाही. यंदा तो गुजरात संघाकडून खेळेल. या पर्वात ‘फझल’ कुठपर्यंत ‘मजल’ मारतो हे पाहणे औत्सुुक्याचे ठरेल!
२.मिराज शेख:
‘फ्लाइंग मिराज’ म्हणून ओळखला जातो. इराण संघाचा सध्याचा कर्णधार.याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या विचित्र परंतु प्रभावी ‘स्टान्स’ ज्यामुळे त्याला ‘टॅकल’ करणे अत्यंत अवघड जाते!दिल्ली संघाची कर्णधारपदाची जबाबदारी त्याचाकडे दिली जाऊ शकते!
३.हादी ओष्टोरोक:
इराणच्या संघातला अत्यंत उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू! प्रो कबड्डीत मात्र त्याने आपल्या चढायांपेक्षा ‘टॅकल्स’ ने सर्वांना प्रभावित केले आहे! मागच्या पर्वात ‘पाटना पायरेट्स’ला अंतिम सामना जिंकून देण्यात याचा मोलाचा वाटा होता. पाटनाने प्रसंगी आपला कर्णधार चेरलाथन याला बसवून हादीला खेळवले यातच त्याचे महत्त्व अधोरेखित होते! ‘यू मुम्बा’कडून यंदा तो चांगला खेळ करेल असे अपेक्षित आहे!
४. अबोफाझल मघसौदलौ महाली:
प्रो कबड्डीमध्ये आपल्या करियरची सुरुवात यू मुंबा संघाकडून केली. आपण अबोलफझल याला बदलीचा खेळाडू म्हणून संघात येताना आणि रिडींग करताना पहिले आहे. त्यानंतर तो पाटणा पायरेट्समध्ये गेला आणि तिथे त्याने मागच्या पर्वात विजेतेपद मिळाले. कबड्डी विश्वचषकात अबोलफझल इराण संघाचा महत्वाचा खेळाडू होता तर प्रो कबड्डीमध्ये खेळताना त्याने १२ सामन्यात २५ रेडींगचे गुण मिळवले आहेत.
५. अबोझर मोहजेर मिघानी:
इराणचे खेळाडू हे त्यांच्या ‘स्ट्रॉंग डिफेन्स’साठी ओळखले जातात. इराण संघातील नैसर्गीक क्षमता असलेला अबोझार हा आणखी एक उदयोन्मुख खेळाडू. कबड्डी विश्वचषकात खूप उत्तम डिफेंसिव्ह खेळाचे प्रदर्शन करणारा अबोझार या वर्षी प्रो कबड्डीमध्ये फॉरचून जायंट्स गुजरात संघाकडून करणार आहे.
या प्रमुख खेळाडूंशिवाय-
अबुल फझल मगसुदलू
मोहम्मद मगसुदलू
मोहसेन मगसुदलू
फरहाद मिलाघरदाण
हादी ताजिक
हे इराणी खेळाडूही आपलं नशीब आजमावतील!
– शारंग ढोमसे आणि राजकुमार ढगे (टीम महा स्पोर्ट्स )