आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा असे दिसून आले आहे की एखाद्या खेळाडूची जन्मभूमी वेगळ्या देशात असते आणि तो खेळतो दुसऱ्या देशाकडून. युरोपियन युनियन (ई.यू.) देशांसाठी कोल्पक करारही आहे. यामध्ये खेळाडू कोणत्याही युरोपियन संघामध्ये परदेशी खेळाडू म्हणून क्रिकेट खेळू शकतात. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंचे लक्ष इंग्लंडसारख्या संघाकडून खेळण्याकडे असते. तसेच अनेकदा इंग्लंड संघात विविध देशांत जन्मलेले खेळाडू खेळताना दिसून येतात.
क्रिकेट इतिहासात आतापर्यंत असे २७ खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. यातील काही क्रिकेटपटू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये २ देशांकडून खेळले आहेत तर काहींनी केवळ वनडे आणि टी२० मध्ये किंवा फक्त एका स्वरूपात २ देशांचे प्रतिनिधित्व केले आहे.
या लेखात, त्या ५ भाग्यशाली खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे, ज्यांना एक नव्हे तर दोन देशांकडून टी२० क्रिकेट खेळण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.
दोन देशांचे प्रतिनिधित्त्व करणारे पाच प्रसिद्ध क्रिकेटपटू (5 Players Playing T20 Cricket From 2 Different Countries)
१. ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) – आयर्लंड आणि इंग्लंड
आयर्लंडमध्ये जन्मलेला क्रिकेटपटू ऑयन मॉर्गनने गेल्या वर्षी (२०१९) आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला विश्वचषक जिंकून देत इतिहास रचला होता. इंग्लंड संघासाठी त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २००९ मध्ये त्याने इंग्लंडकडून पदार्पण केले होते, परंतु त्याआधी तो आयर्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळत होता.
२००६ मध्ये मॉर्गनने आयर्लंड संघासाठी पहिला सामना खेळला. २००७ च्या विश्वचषकामध्ये मॉर्गन आयर्लंड संघाचा भाग होता. आयर्लंडकडून त्याने २३ वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याने इंग्लंडकडून १६ कसोटी सामने आणि २१३ वनडे सामने खेळले आहेत.
२. डर्क नॅन्स (Dirk Nannes) – नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेला क्रिकेटपटू डर्क नॅन्सने नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २००९ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषकात त्याने नेदरलँड संघाचे प्रतिनिधित्व केले. दोन महिन्यांनंतर त्याला ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि स्कॉटलंडविरुद्ध ऑगस्ट २००९ मध्ये झालेल्या वनडे मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले.
आयसीसी टी२० विश्वचषक २०१० मध्ये या वेगवान गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियाच्या संघातदेखील समावेश होता. एकूणच त्याने नेदरलँड्सकडून दोन टी२० आणि ऑस्ट्रेलियासाठी १५ टी२० आणि एक वनडे सामना खेळला आहे.
३. रुडोल्फ वॉनडर मर्व (Roelof Van Der Merwe) – नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात प्रतिभाशाली खेळाडूंची कमी नाही. या प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये जोहान्सबर्ग येथे जन्मलेल्या रुडॉल्फ वॉनडर मर्व या अष्टपैलू क्रिकेटपटूचा समावेश होतो. वॉनडरची विशेषता ही त्याची फिरकी गोलंदाजी, मधल्या फळीतील फलंदाजी आणि कमालीचे क्षेत्ररक्षण ही आहे.
पण, वॉनडरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात दक्षिण आफ्रिकाकडून केली नव्हती. त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात लवकर स्थान न मिळाल्यामुळे तो नेदरलँड संघाकडून क्रिकेट खेळला होता. नेदरलँड संघाकडून त्याने केलेल्या दमदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात त्याला स्थान मिळाले. एप्रिल २००९ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० सामन्यातून त्याने दक्षिण आफ्रिका संघात पदार्पण केले होते. अशाप्रकारे वॉनडरने टी२० क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्त्व केले आहे.
४. ल्यूक रोन्ची (Luke Ronchi) – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
माजी क्रिकेटपटू ल्यूक रोन्चीचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला आणि ऑस्ट्रेलियामध्ये लहानाचा मोठा झाला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ४ कसोटी सामने, ८५ वनडे आणि ३३ टी२० सामने खेळले आहेत. त्याची विस्फोटक फलंदाजी मर्यादित षटकांच्या स्वरूपासाठी योग्य होती आणि म्हणूनच त्याला कसोटीत स्थान मिळवता आले नाही.
२००७-०८ मध्ये तो वेस्ट ऑस्ट्रेलियाकडून खेळाला. त्याला लवकरच ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. कारकीर्दीतील चौथ्या वनडे सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने कारकिर्दीची आशादायक सुरुवात केली होती. परंतु लवकरच त्याचा फॉर्म गेला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने त्याला संघात स्थान दिले नाही.
त्यानंतर रोन्चीने आपल्या जन्म देशासाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि त्याला लवकरच न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवडले गेले. फलंदाज आणि यष्टीरक्षक असल्याने न्यूझीलंडसाठी तो एक महत्वाचा खेळाडू बनला.
तो २०१५ च्या विश्वचषकात न्यूझीलंड संघाचा सदस्य होता. त्याने २०१७ मध्ये शेवटची आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धा खेळली आणि निवृत्तीची घोषणा केली.
५. इजातुल्लाह दौलतजई (Izatullah Dawlatzai) – अफगाणिस्तान आणि जर्मनी
वेगवान गोलंदाज इजातुल्लाह दौलतजई याने गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या दौलतजईने ऑक्टोबर २०१०मध्ये केन्याविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीतील चौथ्या वनडे सामन्यात दमदार कामगिरी केली होती. नेडरलँडविरुद्ध झालेल्या या सामन्यात दौलतजईने ३८ धावा देत ४ विकेट्स चटकावल्या होत्या. त्याच्या दमदार कामगिरीमुळे अफगाणिस्तानने तो सामना ५ विकेट्सने जिंकला होता.
२०१२ साली विश्वचषक टी२० क्वालिफायर सामन्यातून दौलतजईने टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण, अफगाणिस्तानकडून काही टी२० सामने खेळल्यानंतर दौलतजई यूरोपला रवाना झाला. तिथे त्याने जर्मनी टी२० क्रिकेट संघात स्थान मिळवले. तो आता जर्मनी संघाचा भाग आहे.
ट्रेंडिंग लेख –
केवळ एका वनडे सामन्यात संघाचे नेतृत्त्व करायला मिळालेले ३ भारतीय दिग्गज
अ दर्जाच्या क्रिकेटमधील ५ दिग्गज भारतीय खेळाडू, जे वनडे क्रिकेटमध्ये ठरलेत फ्लॉप
आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या –
अशी झाली चहल आणि धनश्रीची पहिली भेट; जाणून घ्या प्रेमापासून ‘रोका’पर्यंतचा प्रवास
पंजाबमधील नव्या स्टेडियमला देण्यात येणार ‘या’ माजी कसोटीपटूचे नाव
ब्रेट लीची भविष्यवाणी कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद