भारतात क्रिकेटला मोठी लोकप्रियता आहे. छोट्या गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र क्रिकेट खेळताना दिसून येते. अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धा भारतात होत असतात. त्यात बीसीसीआयच्या अंतर्गत होत असलेल्या देशांतर्गत स्पर्धांचाही समावेश आहे. या स्पर्धांमधून आपली क्षमता आणि कौशल्य सिद्ध करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची संधी खेळाडूंकडे असते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा मार्ग खेळाडूंकडे असतो. पण अनेक असे खेळाडू आहेत, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. परंतू त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही किंवा खूप उशीरा ती संधी मिळाली.
या लेखात अशा फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. ज्यांची सरासरी ४५ च्या पुढे आहे, परंतू त्यांना वनडेत खेळण्याची संधी अजून मिळालेली नाही. अ दर्जाचे क्रिकेट म्हणजे विविध स्तरावर खेळले जाणारे मर्यादीत षटकांचे सामने.
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ४५ पेक्षा अधिक सरासरी असून वनडेत संधी न मिळालेले फलंदाज –
५. ऋतुराज गायकवाड –
पुण्याच्या असणाऱ्या २३ वर्षीय ऋतुराजने मागील काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेट खेळताना सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने महाराष्ट्राकडूनच नाही तर भारत अ संघाकडून खेळतानाही शानदार कामगिरी केली आहे. त्याने २०१६-१७ च्या मोसमातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच २०१७ मध्ये त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ५४ सामन्यात ४९ च्या सरासरीने २४९९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ शतकांचा आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १८७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
४. अभिनव मुकुंद –
३० वर्षीय अभिनव मुकुंदने २०११ ला इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ कसोटी सामने खेळले. मात्र या व्यतिरिक्त त्याला भारताकडून अन्य क्रिकेट प्रकारात खेळण्याची संधी मिळाली नाही. असे असले तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ८४ सामने खेळताना ५२.०३ च्या सरासरीने ४१६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १२ शतकांचा आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. १४७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
३. अभिमन्यू ईश्वरन –
बंगालच्या रणजी संघाचे कर्णधारपद सांभाळलेल्या २४ वर्षीय अभिमन्यूने २०१५ मध्ये अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्यानंतर त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. केवळ अ दर्जाच्या क्रिकेटमध्येच नाही तर प्रथम श्रेणीमध्येही त्याची शानदार कामगिरी राहिली आहे. तो २०१८-१९ च्या रणजी मोसमात बंगालकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच त्याची प्रथम श्रेणीमध्ये ४३ पेक्षा अधिकची सरासरी आहे. याबरोबरच त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ५७ सामने खेळले असून यात ६ शतके आणि १७ अर्धशतकांसह ४९.१८ च्या सरासरीने २६५६ धावा केल्या आहेत. १४९ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
२. हनुमा विहारी –
२६ वर्षीय हनुमा विहारीने २०१८ ला इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ९ कसोटी सामने खेळले असून १ शतक आणि ४ अर्धशतके करत सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र अजून त्याला भारताकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.
पण त्याची अ दर्जाच्या क्रिकेटमधील कामगिरी चांगली आहे. त्यामुळे त्याला भारताकडून वनडेतही खेळण्याची संधी मिळू शकते. त्याने आत्तापर्यंत अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ७४ सामने खेळले असून ४५.७३ च्या सरासरीने २९२७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतकांचा आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर त्याने २० विकेट्सही गोलंदाजी करताना घेतल्या आहेत. त्याची अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १६९ धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.
१. देवदत्त पड्डीकल –
१९ वर्षीय देवदत्त पड्डीकलने मागील काही महिन्यांमध्ये त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो २०१९-२० च्या रणजी मोसमातही कर्नाटककडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने २०१९ मध्ये अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आत्तापर्यंत १३ अ दर्जाचे सामने खेळले असून ५९.०९ च्या सरासरीने ६५० धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांचा आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १०३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचे वय पाहता त्याच्याकडे अजूनही वेळ आहे. त्याने पुढेही त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवले तर त्याला भारताकडून खेळण्याची भविष्यात संधी मिळू शकते.
ट्रेंडिंग लेख-
विदेशी मुलींना जीवनसाथी म्हणून निवडलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्स घेणारे ३ यष्टीरक्षक, पहा कोण आहेत २ भारतीय
टीम इंडियाशिवाय अजूनही दोन संघांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले २ क्रिकेटपटू